खजुरिया तलावावरील उद्यान ‘जैसे थे’ राहणार, मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द

100 वर्षे जुने खजुरिया तलाव बुजवून अ‍ॅम्फी थिएटरसह बांधलेल्या मनोरंजन उद्यानाचे पाडकाम करण्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश शुक्रवारी सर्वेच्च न्यायालयाने रद्द केला. खजुरिया तलावाची पूर्वीची स्थिती, उद्यानाचे सध्याचे पर्यावरणीय मूल्य आणि उपाययोजनांची व्यवहार्यता विचारात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.

कांदिवली पश्चिमेकडील खजुरिया तलाव पूर्वीच्या स्थितीत आणण्याचे आणि अ‍ॅम्फी थिएटरसह बांधलेल्या उद्यानाचे पाडकाम करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 2018 मध्ये दिले होते. त्याला मुंबई महापालिकेने आव्हान दिले होते. भाजप आमदाराच्या अट्टहासावरून पालिकेने ऐतिहासिक तलाव बुजवून त्यावर उद्यान उभारले होते. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. विकसित जागेपासून नागरिकांना आता होणारा फायदा उच्च न्यायालयाने विचारात घ्यायला हवा होता. ते उद्यान यापुढे व्यावसायिक गोष्टी न करता सार्वजनिक वापरासाठी केवळ हिरवीगार जागा म्हणून राखले जाईल, असे खंडपीठाने म्हटले.