एखाद्या माता पित्यासाठी आपला मुलगा सर्वस्व असतो, त्याच्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. दिल्लीमध्ये अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. डोळ्यादेखत गेली अकरा वर्षे मुलाच्या वेदना पाहणाऱ्या आई-वडिलांनी आपल्या 30 वर्षांच्या मुलाच्या इच्छामरणासाठी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
आई-वडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी इच्छामरण मागितले आहे. त्यांचा हा मुलगा गेल्या 11 वर्षापासून निष्क्रिय अवस्थेत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो बरा होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय त्याच्या उपचारांचा खर्च वाढत असल्याने त्यांना तो परवडणारा नाही. अशावेळी आई-वडिलांनी त्याच्या राइल्स ट्युब हटविण्याच्या तपासासाठी वैद्यकीय मंडळाची नियुक्ती करावी, अशी विनंती कुटुंबाने न्यायालयाकडे केली. ट्यूब काढल्यास त्यांच्या निष्क्रीय मुलाचे इच्छामरण होईल. यामुळे त्याला वेदनांपासून आराम मिळेल, असे आई-वडिलांनी याचिकेत म्हटले आहे.
राइल्स ट्युब एक डिस्पोजेबल ट्युब आहे. या ट्युबला नाकाच्या माध्यमातून पोटात सोडले जाते. याचा उपयोग अन्न आणि औषध पोटापर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. राइल्स ट्यूब हटविणे निष्क्रिय इच्छामरणाचा भाग नाही. राइल्स ट्युब हटवल्यास रुग्ण भूकेने मरून जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. कोणती संस्था त्याची देखभाल करू शकते का? याची माहिती सरकारने काढावी, असे कोर्टाने म्हटले.
तरुणाला दीर्घकालीन मदत कशी करता येईल? याचा तपास करण्याी सूचना कोर्टाने सरकारला केली. हा तरुण सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. मोहालीतील पेइंग गेस्ट हाऊसच्या चौथ्या मजल्यावरून तो पडला होता. यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला क्वाड्रिप्लेजिया (100 टक्के अपंगत्व) चा त्रास होता. त्याच्या पालकांनी मर्यादित उत्पन्न असूनही मुलाच्या उपचारासाठी दीर्घ संघर्ष केला.