रागात घालून पाडून बोलणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे – सर्वोच्च न्यायालय

510

रागाच्या भरात एखाद्याला घालून पाडून बोलणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका 15 वर्षे जुन्या प्रकरणात नोंदवले आहे. प्रियकराच्या आईवडिलांनी ‘कॉलगर्ल’ म्हणून हिणवल्याने कोलकात्यातील एक मुलीने 2004 साली आत्महत्या केली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी प्रियकर आणि त्याच्या आईवडिलांची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली. ‘अपमानकारक भाषेचा वापर’ हे आत्महत्येचे कारण मानण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांनी प्रियकर आणि त्याच्या आईवडिलांविरोधात मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर प्रियकर आणि त्याच्या आईवडिलांना दिलासा मिळाला. ‘कॉर्ल गर्ल’ म्हटल्यामुळे आरोपींना मुलीच्या आत्महत्येस जबाबदार धरणे योग्य नसल्याचे मत यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा आणि आर. सुभाष रेड्डी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. रागाच्या भरात मागचा पुढचा विचार न करता बोललेले शब्द म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे होत नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

आत्महत्या हा एकच मार्ग असू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णयच कायम ठेवला. आत्महत्येसाठी आरोपींना दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणात आत्महत्या हा एकच मार्ग असू शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. यापूर्वीही अशाच एका प्रकरणात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून पतीची निर्दोष मुक्तता केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या