
महाराष्ट्रातील पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुका काही महिन्यांवर आल्या असतानाच सर्वोच्च न्यायालय बुधवारी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाची महत्त्वपूर्ण सुनावणी घेणार आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठापुढे 16 व्या क्रमांकावर हे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले आहे. या वेळी निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेबाबत अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे.
शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाला पक्ष व धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. जुलैमध्ये त्यांच्या याचिकेची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि अंतिम सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. हे प्रकरण आता निकाली काढायचेय, असे न्यायालय म्हणाले. त्यानुसार बुधवारी न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये मिंधे गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याच्या विनंतीबरोबर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालय अंतिम यक्तिवाद ऐकून घेणार आहे. न्यायालयाच्या कार्यतालिकेवर 16 व्या क्रमांकावर प्रकरण सूचिबद्ध आहे. त्यामुळे सविस्तर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे भवितव्य ठरणार असल्याने राजकीय वर्तुळासह असंख्य शिवसैनिक आणि राज्यातील जनतेचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे. याचवेळी चोरलेला पक्ष आणि निवडणूक चिन्ह गमवावा लागण्याच्या शक्यतेने मिंधे गटाची धाकधूक चांगलीच वाढली आहे.
मुंबई, ठाण्यासह इतर महापालिका आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या निवडणुकांआधी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाबाबत निर्णय देण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे करण्यात आली आहे. त्यांची विनंती मान्य करीत न्यायालय अंतिम सुनावणी घेण्यास राजी झाले आहे. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या मिंधे गटाच्या पायाखालील वाळू सरकली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जुलैमध्ये शिवसेनेबाबत अंतिम सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली होती. बुधवारी हे प्रकरण 16 व्या क्रमांकावर सुनावणीसाठी निश्चित केले आहे. त्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत सुनावणी अपेक्षित आहे. आम्ही यापूर्वीच न्यायालयाकडे लेखी युक्तिवाद सादर केले आहेत. त्यामुळे अंतिम युक्तिवाद पूर्ण व्हायला अधिक वेळ लागणार नाही. – अॅड. असीम सरोदे, शिवसेनेचे वकील
‘या’ मुद्दय़ांवर होणार युक्तिवाद
- ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयागाचा निर्णय ‘सिम्बॉल रुल’ला धरून आहे का?
- ‘सिम्बॉल ऑर्डर’नुसार आयोगाला केवळ पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत पक्ष कोणाचा आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकतो का? शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव देत निवडणूक आयोगाने अधिकार कक्षा ओलांडली आहे का?
- ‘शिवसेना’ पक्षाच्या नावाबाबत निर्णय घेताना आयोगाने अधिकाराचा अवास्तव वापर केला आहे का?