ते एकमेकांचे नाहीत, तर आपले काय होणार? सुप्रिया सुळे यांचा महायुतीवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या तुळजापूर, धाराशिव येथील सभेत पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर प्रहार केला. तसेच कोणत्याही चांगल्या योजना आम्ही बंद करणार नसून त्यात आणखी सुधारणा करत त्या आणू ,असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लाडकी बहीण या फसव्या योजनेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर करून महिलांना 1500 रुपये दिले आहेत. सरकारने 1500 रुपये दिल्यामुळे आम्ही लगेच नात्यात वाहून जाऊ असे सरकारला वाटत असल्यास हा त्यांचा गैरसमज आहे,अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेवर निशाणा साधला. तसेच निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणलेल्या या योजनेला महिला भुलणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

कोणताही चांगली योजना आम्ही कधीही बंद करणार नाही, उलट त्यात चांगल्या सुधारणा करून ती मांडू, असेही त्यांनी सांगितले. महायुती सरकारच्या कारभारावर सुप्रिया सुळे यांनी हल्ला चढवला. या सरकारला आपण खूप जवळून पाहिले आहे, ते एकमेकांचे नाहीत, तर आपले काय होणार, असा सवाल करत त्यांनी महायुतीला जबरदस्त टोला लगावला.