कारण हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा, सुप्रिया सुळे यांनी केली मोठी मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जे हेलिपॅड उभारले त्याचे टेंडर निघण्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघाली होती असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच याची चौकशी व्हावी अशी मागणी करत हा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा आहे असे सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. त्यासाठी मालवणात हेलिपॅडही उभारले होते. पण या कामाचे टेंडर निघण्यापूर्वीच वर्क ऑर्डर निघाली होती, सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तपत्राची बातमी शेअर करून हा आरोप केला आहे.

एक्सवर पोस्ट करून सुळे म्हणाल्या आहेत की, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महायुती सरकारच्या कारभाराचे एक एक काळे कारनामे उघडे पडत आहेत. या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी उभारलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडच्या कामाचे टेंडर निघण्यापुर्वीच त्याची वर्क ऑर्डर काढण्याचा पराक्रम या सरकारने केल्याचे समोर आलेय. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कायदा सर्वोच्च होता. पण या सरकारने त्यांच्याच कामात कायदा पायदळी तुडविला ही बाब सर्वाधिक संतापजनक आहे असे सुळे म्हणाल्या. तसेच या संपूर्ण प्रकाराची निःष्पक्ष चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे. हा विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा आहे असेही सुळे म्हणाल्या.