मला रोहितची काळजी वाटते, मुख्यमंत्र्यांनी त्याची सिक्युरिटी रिव्ह्यू करावी, सुप्रिया सुळे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुद्दे मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः रोहित पवारांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

जय, पार्थ, वहिनी आणि समस्त पवार कुटुंब आणि दादांवर प्रेम करणारे लाखो, करोडो लोक आहेत ज्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, जी अस्वस्थ करणारे आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रोहित अस्वस्थ असून सातत्याने न्याय मागण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच वेळी पार्थ, जयवर हा एवढा मोठा शॉक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून जयनेही काल त्याच्या भावना व्यक्त केल्या, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अर्थाच मला रोहितची काळजी वाटते. कारण रोहित अनेक मुद्दे मांडतोय, भावना मांडतोय, तथ्य मांडतोय. डेटा दाखवतोय. त्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते. महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की, ज्या पद्धतीने रोहित लढतोय, त्यामुळे रोहितला सुरक्षा द्यावी. त्याच्या सिक्युरिटीचा सीएमनी आढावा घ्यावा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.