अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही, त्यात नवल ते काय? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवार गटाला एनडीए सरकारमध्ये एकही मंत्रिपद मिळाले नाही. अजितदादांच्या गटाला राज्यमंत्रिपदाची ऑफर करण्यात आली होते. मात्र, त्यांनी त्याला नकार दिला आहे. अजित पवारांना मंत्रिपद मिळाले नाही, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी शरद पवार आणि मला निमंत्रणासाठी फोन आला होता. मात्र, उद्या पक्षाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असल्याने आम्ही दोघेही उपस्थित राहणार नाही, असे कळवले आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजित पवार गटाला मंत्रिपद मिळाले नाही, याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुसऱ्याच्या घरात ढवळढवळ मी करत नाही. मी भाजपचे पक्षात सोबतच वागणं दहा वर्षे जवळून पाहिले. त्यामुळे अजित पवार गटाला मंत्रिपद मिळाले नाही, यात नवल वाटायचं कारण नाही, असा टोला त्यांनी लगावला.

शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची ओळख होती. त्याला काळीमा फासण्याचा काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. पहिल्याच पावसात शहरात पाणी तुंबले, याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे. अडीच वर्षे झाले महापालिका निवडणुका नाहीत. हे खोके सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. प्रशासकीय कामांमध्ये सत्ताधाऱ्यांचे लक्ष नाही, अशी टीकाही सुळे यांनी केली.