
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट असून कॅबिनेट मंत्री निधी कपात केला जात असल्याची आणि निधी वळवला जात असल्याचे म्हणत आहे. फिस्कल मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत महाराष्ट्राची परिस्थिती भीषण आहे. सरकारचा सातत्याने जमिनी, कंपन्या विकण्याचा घाट दिसतोय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला.
वर्ल्ड बँक डेटा सांगतो की सर्वात जास्त कर्ज घेणारा देश हिंदुस्थान आहे. राज्याची परिस्थितीही बिकट आहे. कॅबिनेट मंत्री सातत्याने निधी कपात केल्याची तक्रार करत आहेत. याचाच अर्थ परिस्थिती चिंताजनक आहे. सरकारचा जमिनी, कंपन्या विकण्याचा घाट आहे. आपण आपल्या घरातील सोनं, चांदी कधी विकतो, अडचणीत असतो तेव्हा विकतो. जर सरकार जमिनी विकतेय याचा अर्थ कळतोय ना. महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक परस्थिती चिंताजनक असून वाढणारी गुन्हेगारी अशीच राहिली तर महाराष्ट्राची जी वेगळी ओळख आहे त्याला तडा जाऊ शकतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
घायवळ प्रकरणावर म्हणाल्या…
कुख्यात गुंड नीलेश घायवळ प्रकरणावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. विमानतळावर अत्याधुनिक ओळख पटविण्याच्या यंत्रणा उपलब्ध असताना देखील एखादी व्यक्ती खोटा पासपोर्ट वापरून देशातून फरार होते, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. या प्रकरणाची चौकशी इथे राज्यात होईलच मात्र मी हा मुद्दा केंद्रातील परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयापर्यंत पोहोचविणार आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच राजकारण बाजुला ठेऊन महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवभोजन योजनेतील महिलांवर आत्महत्येची वेळ
शिवभोजन योजनेतील महिला संचालक अडचणीत आल्या आहेत. शिवभोजन थाळीचा निधी गेल्या आठ महिन्यापासून थकीत आहे. असं का? असा सवाल करत या महिलांवर आत्महत्येची वेळ आल्याचेही त्या म्हणाल्या. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.