
सगळे डॉक्टर, हेल्थ वर्कर, तुमचं प्रेम, शुभेच्छा यामुळे पवारसाहेबांची प्रकृती आता खूप चांगली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, रुबी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, हेल्थ वर्कर यांचे आभार मानते. पवारसाहेबांची तब्येत चांगली आहे. पाच दिवसांचा अँटी बायोटिक्सचा कोर्स आहे. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळेल” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना दिली.
एकीकडे वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होत असतानाच दुसरीकडे सुप्रिया सुळे या थोरले बंधू अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत. त्यांनी अत्यंत भावूक होत सांगितले की, अजितदादांची उणीव आयुष्यभर भासत राहील. “एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू अशी माझी सध्याची स्थिती आहे. वहिनी सुनेत्रा पवार यांच्यावर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी आली आहे, याचा सार्थ अभिमान आहे; पण दादा आज सोबत नाहीत याचे दुःख मोठे आहे. दादा इतक्या कमी वयात आम्हाला सोडून जातील, असे कधीच वाटले नव्हते,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विमान अपघात चौकशीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोहित पवार यांची अस्वस्थता स्वाभाविक आहे. या अपघाताबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न मुलांच्या मनात आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर आणि पारदर्शक चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून आता सर्वांचे लक्ष त्या चौकशीकडे लागले आहेत.
पक्षांतर्गत चर्चा आणि अजितदादांशी झालेल्या संवादाबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, माझ्या आणि दादांमध्ये काय चर्चा झाली हे केवळ आम्हाला दोघांनाच माहित आहे. “आज माझा भाऊ हयात नाही, त्यामुळे आता जुनी उणी-दुणी काढण्यात किंवा राजकारण करण्यात मला रस नाही. दादांच्या निधनाला अद्याप 15 दिवसही पूर्ण झालेले नाहीत, त्या धक्क्यातून सावरण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या कठीण काळात सुप्रिया सुळे यांनी एक सुखद बातमीही दिली. त्यांची कन्या रेवती आणि सारंग यांच्या लग्नाची त्यांनी अधिकृत घोषणा केली. रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखतात. विशेष म्हणजे, अजितदादांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे लग्न ठरले होते. 30 जानेवारीला संपूर्ण कुटुंब मिळून ही घोषणा करणार होते, मात्र, 28 तारखेलाच दादांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. सर्व सहा भावांच्या आशीर्वादाने हे नाते जुळल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले.



























































