जागतिक आर्थिक मंदीचे सावट पसरत आहे. गुजरातची प्रसिद्ध डायमंड कंपनी किरण जेम्सने 50 हजार कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीने 17 ऑगस्टपासून 27 ऑगस्टपर्यंत सुट्टी दिल्याचे म्हटले आहे.
जागतिक आर्थिक मंदीची झळ आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या मागणीत घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. किरण जेम्सच्या संकेतस्थळानुसार जगातली ही सर्वात मोठी नैसर्गिक डायमंड मॅन्यूफॅक्चर कंपनी आहे. किरण जेम्स कंपनीचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. ‘आम्ही आमच्या 50 हजार कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची सुट्टी दिली आहे. त्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम कापणार आहोत, मात्र सर्व कर्मचाऱ्यांना या अवधीसाठी वेतन दिले जाणार आहे. मंदीमुळे आम्हाला ही सुट्टी जाहीर करणे भाग पाडले आहे’, असे लखानी यांनी सांगितले.
कच्च्या हिऱ्यांच्या मागणीत झालेली घट आणि कंपनीकडून निर्यात केल्या जाणाऱ्या पॉलिश हिऱ्यांच्या मागणीत घट झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मागणी कमी झाल्याचा परिणाम इतर कंपन्यांवरही झाला आहे. मात्र त्याबाबत त्यांनी अजूनही मौन बाळगले आहे. मात्र, या मंदीचे नेमके कारण अद्याप कोणालाच माहीत नसल्याचे लखानी यांनी सांगितले. लोकांना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी किरण जेम्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
सुरत डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश खुंट यांनी लखानी यांच्या मतांचे समर्थन केले. मंदीमुळे हिरे उद्योग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष ही मंदीची काही कारणं आहेत. पॉलिश्ड हिऱ्यांपैकी 95 टक्के निर्यात होत असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला आहे. सुरतमधील जवळपास 4 हजार मोठे आणि छोटे हिरे पॉलिशिंग आणि प्रोसेसिंग युनिट्स सुमारे 10 लाख लोकांना रोजगार देतात, असे जगदीश खुंट म्हणाले.