उमेद – दिव्यांगांचे ‘अनामप्रेम’

>> सुरेश चव्हाण

गेली 20 वर्षं अपंग, दृष्टिहीन, मूक-बधिर बांधवांसाठी अहमदनगर, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी आपलं नाव सार्थ करत ‘अनामप्रेम’ ही संस्था कार्य करत आहे. दिव्यांग बांधवांना जीवनोपयोगी मूलभूत प्रशिक्षणासह शिक्षित करून सरकारी, निम-सरकारी क्षेत्रात नोकऱया, रोजगार उपलब्ध करून देत त्यांना सक्षम केले जात आहे.

अंध, अपंग, अस्थिव्यंग, मूकबधिर आणि इतर दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी धडपडणाऱया ‘अनामप्रेम’ या संस्थेची स्थापना डॉ. गिरीश कुलकर्णी व त्यांचे सहकारी यांनी 2005मध्ये केली. समाजातील दिव्यांगांना शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार, पुनर्वसन अशा विविध सेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहेत. दिव्यांगांच्या जीवन परिवर्तनासाठी संशोधनात्मक पद्धतीने ‘अनामप्रेम’ काम करत आहे. ‘अनामप्रेम’तर्फे अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यामध्ये दिव्यांगांच्या प्रत्यक्ष शिक्षणासाठी ‘हिंमत भवन वसतिगृह’ चालवलं जातं. या भवनाच्या माध्यमातून दिव्यांग मुला-मुलींना मोफत भोजन, निवास, वैद्यकीय सोयीसुविधा पुरविल्या जातात. ‘अरुण मृणालिनी संगणक प्रशिक्षण केंद्रा’तून या मुलांना कॉम्प्युटरचा पायाभूत कोर्स, इंटरनेटचे प्रशिक्षण, इंग्रजी संभाषण कौशल्य, मोबाईलचा वापर, अत्याधुनिक प्ले टॉक, ऑडिओ प्लेयर, लॅपटॉप इत्यादींचं ज्ञान दिलं जातं.

दिव्यांगांना जगताना येणाऱया अडचणींची सोडवणूक करण्यासाठी त्यांना विविध प्रकारे मदत केली जाते. त्यामध्ये कृत्रिम अवयव रोपण, शासकीय सोयीसुविधांपासून वंचित असणाऱया बांधवांना समुपदेशन केलं जातं. अंध बांधव, भगिनींना व दिव्यांगांना सर्व प्रकारचं आधार साहित्य दिलं जातं. जयपूर फूट कॅम्प, मोतीबिंदू तपासणी शिबिरं, कान-वाचा तपासणी केली जाते. त्याचबरोबर दिव्यांगांना शिष्यवृत्तीही मिळवून दिली जाते. एक अनोखा उपाम त्यांच्यासाठी राबवला जातो तो म्हणजे ‘हेलन केलर वाचनालय!’ या वाचनालयातून दिव्यांगांना स्पर्धा परीक्षा साहित्य, ाढमिक पुस्तकं तसेच अंधांसाठी ब्रेल साहित्य हे वाचनालय पुरवतं. ‘स्पर्श सेतू’, ‘ज्ञानोदय’, ‘ब्रेलधारा’ या ब्रेलमासिकांसोबतच ‘लोकराज्य’, ‘साधना’ मासिकांचाही समावेश असतो. ‘प्रकाशवाटा’ या ब्रेल मराठी मासिकाचा अंधांना शासकीय व निमशासकीय नोकऱया मिळवण्यासाठी, निवडपरीक्षा पात्रतेसाठी उपयोग होतो.

‘प्रकाश गान संगीत मंच’ हा सुरांचे आगळे भावविश्व निर्माण करणारा ऑर्केस्ट्रा ‘अनामप्रेम’च्या माध्यमातून गेली 18 वर्षं दिव्यांगांना व्यासपीठ मिळवून देत आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, दिवाळी पहाट या कार्पामांतून ही मंडळी शास्त्राrय गायन, चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं सादर करतात व त्यातून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा मिळते. यातील अंध, अपंग मुलं विविध वाद्यं वाजवून त्यांची कला रसिकांसमोर सादर करतात; त्यांना प्रेक्षकांचाही भरपूर प्रतिसाद मिळतो.

अहमदनगर शहराजवळील निंबळक येथे ‘सत्यमेव जयते ग्राम प्रकल्प’ 2014पासून सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून अनेक दिव्यांगांना रोजगार मिळाला आहे. ‘कौशल्य विकासालया’च्या माध्यमातून ‘साथी चप्पल स्टॉल योजना’ उपलब्ध करून देत दहा दिव्यांग स्वयंपूर्ण झाले आहेत. दिव्यांगांना रवीनंदा संकुल येथे दोन महिन्यांच्या निवासी प्रशिक्षणात संगणक कौशल्य, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा याची माहिती दिली जाते. शिवाय खासगी कंपन्यांतून नोकरी मिळवून दिली जाते.

संस्थेने नगर जिह्यामध्ये वयवर्षं 5 ते 12 वयोगटातील जन्मत अंध, अस्थिव्यंग बालकांसाठी ‘गौरांग अभिनव शाळा’ या निवासी शाळेची स्थापना केली आहे. परदेशातील शिक्षण पद्धतीवर आधारलेल्या या शाळेत सध्या 14 बालकं शिकत आहेत. पुणे येथील कात्रज परिसरात शारदा गौडा यांच्या जागेत ‘अनामप्रेम’चं पहिलं निवासी वसतीगृह 2018मध्ये सुरू करण्यात आलं. आता हे वसतीगृह बिबवेवाडी येथील चंद्रकांत धुपकर यांच्या जागेत विस्तारलं आहे. येथे अंध, अल्पदृष्टी असलेली मुलं राहत असून ती पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. संस्थेला आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य युवा पुरस्कार, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, राज्यस्तरीय मुंबई ब्रेल गौरव पुरस्कार अशा पुरस्कारांचा यात समावेश आहे.

निंबळक-इसळक येथे ‘आधार ग्राम’ या प्रकल्पात यशवंत व कुंदा आध्ये यांच्या सहकार्यातून ‘यशवंत प्रकल्प’ हा अपंगांच्या पुनर्वसनासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारतातील व्हीलचेअर वापरणाऱयांना प्रेरणा देणारे डॉ. विजय गर्दे यांचे मार्गदर्शन व सहकार्यातून पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या रुग्णांना सहा महिन्याचं प्रशिक्षण देऊन पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने यशवंत प्रकल्प काम करत आहे. संभाजीनगर येथे गारखेडा परिसरात रघुवीर व विलास कुलकर्णी यांच्या जागेत ‘अनामप्रेम’चा प्रकल्प सुरू झाला आहे. तेथील ‘मंगल बंधन विवाह सूचक केंद्रा’त उपवर दिव्यांग तरुण-तरुणींना योग्य जीवनसाथी मिळवून देण्यासाठी हे केंद्र काम करतं. दरवर्षी दिव्यांगांसाठी सामुदायिक विवाह मेळावा घेतला जातो.

संस्थेचे अध्यक्ष अजित माने, उपाध्यक्ष बापूसाहेब कांडेकर, सचिव अनिल गावडे, खजिनदार राधाताई कुलकर्णी व दैनंदिन कामकाजात लक्ष घालणाऱया डॉ. मेघना मराठे तसेच संचालक अभय रायकवाड संस्थेचे आधारस्तंभ अरुण शेठ व डॉ. प्रकाश शेठ या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे संस्था हे सेवा कार्य चांगल्या प्रकारे करत आहे.
[email protected]