>> सुरेश चव्हाण
स्थलांतरित निर्वासितांच्या मुलांनी केवळ सिग्नलवर भीक मागत जगणे व मुख्य प्रवाहातील शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित राहणे, हे पिढय़ान् पिढय़ांचे दुष्टपा भेदत, ‘समर्थ भारत व्यासपीठ‘ ही सामाजिक संस्था गेल्या नऊ वर्षांपासून लोकसहभागातून ठाणे येथील तीन हात नाका सिग्नलच्या पुलाखाली आधुनिक सोयीसुविधांनीयुक्त असलेली ‘भारतातील पहिली सिग्नल शाळा‘ चालवत आहे.
उदरनिर्वाहासाठी लाखो कुटुंबं शहरात स्थलांतरित होत असतात. त्यातील काही पुढे स्थलांतरणाच्या ठिकाणी स्थिर होतात. ज्यांच्या वाटय़ाला हे भाग्य येत नाही, अशी हजारो कुटुंबं व त्यांची लाखो मुलं आजन्म स्थलांतरित, विस्थापितच राहतात. ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर प्रामुख्याने भटके, विमुक्त जमातीतील शंभरहून अधिक मुलं पुलाखाली आश्रय घेऊन प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन करत होती. 22 वर्षांपूर्वी त्यांचे आजोबा महानगरामध्ये स्थलांतरित झाले. त्यांचे वडील इथेच वाढले. अशा या मुलांचा जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. हे एकटय़ा ठाणे शहराचे दृश्य नसून भारतातील प्रत्येक महानगरांमध्ये अशी लाखो मुलं आपल्याला पाहायला मिळतील.
शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा मागासलेली ही मुलं मुख्यधारेच्या शाळांसाठी अपात्र ठरतात. असंख्य कारणांमुळे ती शाळेत जाऊ शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या कपाळावर शाळाबाह्यतेचा लागलेला शिक्का पुसण्यासाठी शाळा त्यांच्याजवळ घेऊन जाणे, हा एकमेव पर्याय होता. ‘समर्थ भारत व्यासपीठ‘ या सामाजिक संस्थेने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने नऊ वर्षांपूर्वी ‘देशातील पहिली सिग्नल शाळा‘ सुरू केली. संस्थेचे संस्थापक मुकुंदराव गोरे यांसह घरातूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभलेले भटू सावंत, हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर प्रकल्प प्रमुख म्हणून आरती परब ‘सिग्नल शाळे’ची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. यांच्याबरोबरीने संचालक मंडळात उल्हास कार्ले, अजय जोशी, सुरेंद्र वैद्य, अदिती दाते, निखिल सुळे, सुजय कुलकर्णी व शिक्षक प्रमुख शैला देसले यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे.
सकाळी आठ ते सायंकाळी सहा अशी दहा तास चालणारी ही शाळा, गेली आठ वर्षे याच पुलाखाली कंटेनर्समध्ये भरते व या शाळेत सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. रोज अंघोळ करण्यासाठी स्नानगृह व स्वच्छतागृह असणे गरजेचे होते. मुख्यधारेच्या अभ्यापामाच्या भाषेची लक्ष्मण रेषा ओलांडण्यासाठी मुलांची बोलीभाषा (उदा. पारधी) शिकून घेणारे शिक्षक आणि त्यांच्या बोलीभाषेतून अभ्यापामाच्या भाषेपर्यंत नेणारी व्यवस्था उभी करत हा बदल घडत गेला. भीक मागण्यापासून परावृत्त करणे, उद्याची स्वप्न पाहायला शिकवणे, जगवणे यालाच केवळ संघर्ष न मानता; प्रतिकूल परिस्थितीतही सन्मानाने जगणे या साऱया आव्हानांची उत्तरे सिग्नल शाळेत शोधली जात होती. म्हणूनच उपराष्ट्रपती भवनात जेव्हा या शाळेला ‘अंत्योदय बेस्ट प्रॅक्टिस’ या पुरस्काराने गौरविले गेले; तेव्हा ती शाळा केवळ शाळेचे यश मांडत नव्हती तर शाळाबाह्य मुलांसाठी मुलांकडे जाणारी त्यांच्या पद्धतीने लवचिक असलेली शाळा घडविणे व त्यातून लाखो स्थलांतरित शाळाबाह्य मुलांसाठी एक पथदर्शी प्रकल्प म्हणून उभे राहणे, याचेही यश ती अधोरेखित करत होती.
मुलांसाठी व्यक्त व्हायची मुभा देणारा फळा, तंत्रशिक्षण, संगणक शिक्षण, रोबोटिक शिक्षण, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, सिग्नल शाळा बँक तसेच ाढाrडा मैदान, स्केटिंग ट्रक, लाठी-काठी, कराटे प्रशिक्षण वर्ग, वायफाययुक्त डिजिटल शाळा, कबड्डी, मल्लखांब, खो-खो असे मैदानी खेळ खेळण्यासाठी साधनांनी व सुविधांनी ही शाळा सुसज्ज आहे. या शाळेचे अजून एक वेगळेपण म्हणजे इथे साठ मुलांना शिकवण्यासाठी सतरा शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त वेल्डिंग, सुतारकाम असे इतर व्यावसायिक शिक्षणही दिले जाते.
या शाळेतील आठ मुले दहावी उत्तीर्ण झाली आहेत. चार मुले डिप्लोमा इंजिनीअरिंगपर्यंत पोहोचली. एक मुलगा पदवीधर होऊन पीएसआय परीक्षेची तयारी करत आहे. दोन मुले राज्यस्तरीय विज्ञान संमेलनात पुरस्कार प्राप्त करून त्यांची ‘इस्रो’ भेटीसाठी निवड झाली आहे. चार मुले स्केटिंग स्पर्धेच्या जिल्हा पातळीपर्यंत तर एक मुलगा मल्लखांब ाढाrडा स्पर्धेच्या राज्यपातळीपर्यंत पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुलांनी रशिया, इस्राइलसारख्या तंत्रकुशल देशांच्या रोबोट्सशी स्पर्धा करणारा रोबोट बनवून प्रतिष्ठेचा ‘ज्युरी अवॉर्ड‘ पटकावला आहे. शाळेतील व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षित झालेली मुले वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रातील मान्यताप्राप्त उद्योगांमध्ये नोकरी करू लागली आहेत.
आज ‘सिग्नल शाळा’ हा पथदर्शी प्रकल्प विविध महानगरांमध्ये राबविण्यासाठी सज्ज झाला आहे. काही वर्षांपूर्वीच विधिमंडळात सिग्नल शाळेवर स्वतंत्रपणे तीन वेळा दीर्घ चर्चा झाली. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, विधानसभा अध्यक्ष यांनी आपल्या चर्चेतून राज्य शासनाने हा प्रकल्प ‘पथदर्शी प्रकल्प’ म्हणून स्वीकारावा व ठिकठिकाणी हा प्रकल्प राबवावा यासाठी निर्देश दिले आहेत. मुलांना शाळेत आणण्याऐवजी शाळाच मुलांपर्यंत नेण्याचा हा प्रयत्न त्याच्या वेगळेपणामुळे यशस्वी होत आहे. हा प्रयोग आता देशभर राबवला जावा असा समर्थ भारत व्यासपीठाचा मानस आहे.