गेल्या दोन-तीन वर्षांपासून महेंद्रसिंह धोनीची ही शेवटची आयपीएल अशीच चर्चा होतेय. त्यातच 2024 सालच्या आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवल्यानंतर तो निवृत्त होणार अशा बातम्यांना उधाण आले. पण धोनीने आपल्या आयपीएल निवृत्तीबाबत मौन पाळण्यातच धन्यता मानली. तरीही धोनीने 2025 ची आयपीएलची स्पर्धाही खेळावी, अशी इच्छा त्याचा लाडका संघसहकारी असलेल्या सुरेश रैनाने बोलून दाखवली आहे.
2022 च्या आयपीएलमध्ये सर्वप्रथम धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर 2023 च्या आयपीएलमध्ये धोनीला ज्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली, त्यावरून तो निवृत्त होत असल्याच्या बातम्याही सर्व प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या. पण धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जच्या संघ मालकांनीही त्याबद्दल कोणतीही घोषणा केली नाही. आयपीएल संपल्यानंतर पूर्ण वर्षभर निवृत्तीच्या चर्चांना अक्षरशः उधाण आले होते. 2023 नंतर 2024 च्या मोसमाआधी पुन्हा एकदा धोनीची चर्चा सुरू झाली. ती चर्चा खरी ठरावी असे चित्रही उभे राहिले.
धोनीने आपले कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवल्यानंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग आला. पण गेल्या मोसमात धोनी ज्या पद्धतीने फिनिशर म्हणून खेळला आहे, त्यावरून त्याने पुन्हा एकदा सीएसकेसाठी मैदानात उतरायला हवे. खरे सांगायचे तर गायकवाडला आणखी एक मोसम धोनीची गरज आहे. धोनीने आगामी आयपीएलबाबत आपला कोणताही निर्णय अद्याप जाहीर केला नसल्यामुळे निवृत्तीचा सस्पेन्स कायम आहे.
नुकत्याच एका कार्यक्रमात आयपीएलच्या नव्या नियमांच्या घोषणेनंतर आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनीची ही प्रतिक्रिया असली तरी सीएसकेचे व्यवस्थापन धोनीच्या निवृत्तीचा ग्रॅण्ड इव्हेंट करू इच्छिते. वन डे असो किंवा कसोटी धोनीने आपल्या निवृत्तीचा अचानक निर्णय जाहीर केल्यामुळे त्याच्या कारकीर्दीला मानाचा मुजरा देताच आला नव्हता, मात्र आयपीएलमध्ये ते आता करता येऊ शकते. मात्र धोनीच्या मनात काय चाललेय याचा कुणीही विचार करू शकत नाही.