
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा जोडणारा आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर (डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट) शासनाला सादर केला जाणार आहे. या नवीन घाट मार्गामुळे प्रवासाचे अंतर आणि लागणार वेळ कमी होणार असून समस्त प्रवाशांसाठी नवीन घाट मार्ग फायदेशीर ठरणार आहे.
काही वर्षांपूर्वी नियोजित घाट मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार मागील काही दिवसांत घाट मार्गाचे सर्व्हेक्षण सुरु असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचे सर्व्हेक्षण अल्मोटस या नाशिक स्थित कंपनीकडे देण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे आठ किमीचा घाट मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही होईल. हा घाट मार्ग गावाबाहेरून काढला जाणार आहे. काजीर्डा गावातील होत असलेल्या जामदा प्रकल्पामुळे घाट मार्ग बाहेरून घ्यावा लागत आहे.काजिर्डा घाट मार्गामुळे राजापूर तालुका आणि कोल्हापूर जिल्हा यामधील अंतर आणि वेळ कमी होणार असून प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
यापूर्वी (जुलै २०२१)मध्ये झालेल्या तीव्र अतीवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळुन कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकण – कोल्हापूरसाठी एखादा भक्कम, सुरक्षित आणि तेवढाच महत्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे ते अधोरेखित ठरले होते .आणि अडगळीत जावून पडलेल्या काजिर्डा घाट रस्त्याचा मुद्दा जोरकसपणे पुढे आला होता. रत्नागिरी कोकण आणि कोल्हापूर यांना यापुर्वी सत्तरीच्या दशकात (१९७४/७८)रोजगार हमी योजनेतुन काजिर्डा कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे काम हाती घेण्यात आले होते.मात्र त्याच दरम्यान अणुस्कुरा घाटाच्या खोदकामाचा मुद्दा पुढे आला आणि त्या कामाला आरंभ झाला आणि काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचे काम आपोआप मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरा सह गगनबावडा घाटांना महत्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला होता. कालांतराने काजिर्डा गावात मोठा लघु पाट बंधारे प्रकल्प मंजुर झाला आणि त्याचे काम देखील सुरु झाले होते. तथापी अनेक मुद्द्यांवरुन स्थानिक जनतेतुन संघर्षाची भुमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडला असून अद्यापही त्याचे काम सुरु झालेले नाही. तरीही अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत असायचाच .काही वर्षांपूर्वीच्या काळात या घाटातील साफसफाईचे काम हाती घेण्यात आले होते त्यानुसार लोकवर्गणीतुन घाटातील पायवाट साफ करण्यात आली होती .
दोन वर्षापुर्वी कोकणात झालेल्या अतीवृष्टीत कोकण कोल्हापूर जोडणाऱ्या अनेक घाटात मोठ्याप्रमाणावर पडझड झाली होती आंबा घाट देखील त्यातुन सुटला नव्हता त्यावेळी केवळ अणुस्कुरा घाट मार्ग द्वारे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रकडे जाणारी वाहतुक सुरु होती. सर्व प्रकारची वाहतुक अणुस्कुरा मार्गे रात्रंदिवस सुरु राहिल्याने त्या घाटात देखील खड्डे पडले होते त्यामुळे अणुस्कुरा घाट सुध्दा असुरक्षीत होतो की काय? अशी चिन्हे दिसत होती . अशावेळी कोकण कोल्हापूरला जोडणाऱ्या आणखी एका सुरक्षीत व तेवढाच भक्कम घाटरस्त्याची गरज जाणवू लागली आणि अडगळीत जावुन पडलेल्या काजिर्डा घाटमार्ग एकदम उजेडात आला. कोल्हापूर कोकणला जोडणारा भक्कम व सुरक्षीत म्हणुन काजिर्डा घाटाकडे पाहिले गेले आणि काजिर्डाची दुसरी इनिंग सुरु झाली.
काजिर्डा घाट खोदकाम प्रकरणी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी लक्ष घातले आणि तो प्रश्न शासन दरबारी लावुन धरला होता त्या मुद्द्यावरुन सातत्याने पाठपुरावा केला . काजिर्डा घाटमार्ग कसा उपयुक्त आहे ते पटवुन दिले अखेर त्या प्रश्नी शासनाने सकारात्मकता दर्शविली आणि त्यावेळी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रथमच काजिर्डा घाटाच्या सर्व्हेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती .त्याचे तालुक्यातुन जोरदार स्वागत झाले होते.
काजिर्डा घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी अर्थसंकल्पात एक कोटीची तरतुद झाल्यानंतर संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन त्याचे पुढील नियोजन करण्यात आले. नाशिक मधील अल्मोट्स या कंपनीला सर्व्हेक्षणाचे काम देण्यात आले असून मागील काही दिवसांपासून सुरु असलेले काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ते पूर्ण होईलआणि त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाईल. काजिर्डा घाटामुळे राजापूर तालुक्यातून कोल्हापूर कडे जाणारा आणखी एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असून आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर यामुळे प्रवाशांना प्रवास करताना खूप आनंद घेता येईल.
घाट मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यात चांगला आणि दर्जेदार घाट उपलब्ध होईल. समस्त तालुका वासियांसह पावसाळी दिवसांत कोकणात येणाऱ्या कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र मधील पर्यटकांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.घाटाच्या बाजूलाच बारमाही वाहणारा धबधबा असून पावसाळ्यात तसेच त्यानंतर देखील पर्यटक काजिर्डा गावी भेट देतात. घाट मार्ग सुरु झाल्यावर पर्यटकांना त्या धबधब्याकडे जाण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.





























































