
काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांचा दणका बसला, तरीही हरलेल्या हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास किंचितही डळमळलेला नाही. एका पराभवामुळे आमची खेळण्याची पद्धत बदलणार नाही. आम्ही बेधडकच खेळणार, असे विश्वासाने सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलेय.
दक्षिण आफ्रिकन संघासमोर काल हिंदुस्थानचा डाव अक्षरशः 111 धावांत कोसळला. 188 धावांचा पाठलाग करताना 111 धावांवर सर्व बाद ही केवळ हार नव्हे, तर आत्मपरीक्षणाची वेळ आहे. निव्वळ धावगती घसरली नाही, तर उपांत्य फेरीचा रस्ताही आता काटेरी झाला आहे. पुढचा सामना चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. सरळ शब्दांत सांगायचं तर, करा किंवा मरा.
पॉवरप्लेच ठरला ‘पॉवरलेस’!
मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना सामना प्रारंभीच्या षटकांत जिंकता येत नाही, पण हरता नक्की येतो हे गणित सूर्यकुमारने मान्य केले. सुरुवातीच्या षटकांत अति आक्रमकता उलटली. फलंदाज धडाधड बाद झाले. मात्र भागीदारी उभीच राहिली नाही. पाठलाग करताना छोटय़ा-छोटय़ा भागीदाऱया म्हणजे श्वासोच्छ्वासासारख्या असतात. तो श्वासच थांबला आणि हिंदुस्थान गुदमरला.
काहीही बदलणार नाही!
सूर्यकुमारने पराभवानंतर माघार घेतली नाही; उलट आक्रमक सूर आळवला. आम्ही साधं क्रिकेट खेळू. चांगली फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि धारदार क्षेत्ररक्षण करू. एक सामना काही बदल घडवत नाही. आम्ही जोरदार पुनरागमन करू, असा दृढ विश्वास सूर्याने पराभवानंतर बोलून दाखवला.
आता चेन्नईत काय होणार?
एक पराभव विसरून हिंदुस्थान खऱया अर्थाने ‘ब्रँड’ क्रिकेट खेळणार की दबावाखाली कोसळणार? क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तो मानसिकतेचा कस असतो. सूर्यकुमारचा आत्मविश्वास शब्दांत आहे. आता तो फलंदाजीत आणि नेतृत्वात दिसला, तरच उपांत्य फेरीचा दरवाजा उघडेल.































































