
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई यांच्या वतीने येत्या 18 नोव्हेंबरपासून पोलीस जिमखाना येथे सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग (एसकेसीएल) टी-20 स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 28 नोव्हेंबरला होणार आहे. अध्यक्ष प्रवीण महाले व स्पर्धा संचालक दीपक पाटील यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी 25 ऑक्टोबरला निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 27 व 28 ऑक्टोबरला खेळाडूंची निवड करण्यात आली. 2 नोव्हेंबरला सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती सभागृहात खेळाडूंचा लिलाव मोठय़ा दिमाखात पार पडला. याप्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, स्थानिक आमदार महेश सावंत, जयंत पाटील, दत्तात्रय दळवी, शेखर ठाकूर, रमाकांत रात, युती पाटील, मुकेश महाले, ज्योती रात, अभिजित राऊळ, गौरव ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. या लीगमध्ये विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षीस देण्यात येणार असून उपविजेता संघ 50 हजार रुपयांचा मानकरी ठरेल.
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवायचाय !
आमच्या समाजाचा साईराज पाटील आता मुंबईच्या रणजी संघामधून खेळत आहे. या लीगच्या आयोजनामुळे युवा खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आगामी वर्षांमध्ये या स्पर्धेमधून चॅम्पियन व आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू घडवण्याचे स्वप्न आम्ही पाहत असल्याचे अध्यक्ष प्रवीण महाले यांनी सांगितले.
एसकेसीएलचे सहा संघ
सूर्यवंशी वॉरियर्स, आरडी ब्लास्टर्स, स्वराज इलेव्हन, इन्स्पायर्ड रॉयल्स, सिंबा सिक्सर्स, प्राईड ऑफ पालघर इलेव्हन.




























































