व्यापाऱ्यांच्या मुलाला व्यापारी बनायचं असेल तर…बॉलीवूड ‘नेपोटिझम’वर जिम्मी शेरगिलचं मत

807

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमधील नेपोटिझमची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाही. यामध्ये आता अभिनेता जिम्मी शेरगील याने आपलं मत व्यक्त केलं आहे. जिम्मी म्हणाला, हे तर प्रत्येक फिल्डमध्ये होतं. जर कुणी व्यापारी आपल्या मुलाला व्यापारी बनवू इच्छित असेल तर त्यात चुकीचं काय… घराणेशाहीमुळे जर कुणा नवोदित कलाकाराच्या मार्गात अडचणी येत असतील तर ते चूक आहे. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधताना जिम्मी बोलत होता.

स्वतःला डिप्रेशन आणि नकारात्मकतेपासून दूर कसं ठेवायचं हे सांगताना जिम्मी म्हणाला, करीयरच्या सुरुवातीला मी प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करायचो. 1996 साली ’माचिस’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक गुलजार यांनी मला शिकवलं की, अभिनेत्याने कामात सातत्य ठेवणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही प्रोजेक्टच्या यशावर गर्व करू नये किंवा अपयशावर स्वतःला त्रास करून घेऊ नये. ते तिथेच मागे सोडून पुढे गेलो तर डिप्रेशनला तोंड द्यावं लागणार नाही. अलीकडेच जिम्मी ‘योर ऑनर’ या वेबसीरिजमध्ये दिसला. येत्या काळात पंजाबी सिनेमा ‘शरीक 2’ मध्ये जिम्मी दिसेल. प्रत्येक वर्षी एक तरी पंजाबी सिनेमा करायचं असं या पंजाबी अभिनेत्याने ठरवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या