श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये! गरज आहे तोपर्यंतच आरक्षण घ्यावं, नंतर सोडून द्यावं!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणावरून महाराष्ट्रात रान पेटलेले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये. ज्यांना गरज आहे त्यांनी लाभ घ्यावा आणि ज्यांना लाभ झाला त्यांनी आरक्षण सोडून द्यावे, असे स्पष्ट मत सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

1980 पर्यंत महाराष्ट्रात जात हा महत्त्वाचा मुद्दा नव्हता. सर्व धर्म समभाव असा विचार होता. पण 1985 नंतर परिस्थिती बदलली आणि जातीय वर्गीकरण सुरू झाले. त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बिघडली. देशाच्या दृष्टीने हे चांगले नाही. नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर चालायचे हे मला मान्य नाही, असे सुशील कुमार शिंदे म्हणाले. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काही संबंध नाही. पण राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागल्याचेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आरक्षण देण्याचे सरकारने कबुल केले असेल तर त्यांनी ते त्यांनी द्यायला हवे आणि कायद्याच्या चौकटीत ते कसे बसवायचे हे सरकारने ठरवावे. पण कोणाचे आरक्षण काढून देऊ नये. यामुळे वाद भडकेल. आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा केला पाहिजे. ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, असे स्पष्ट मत सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केले. लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हे ठीक आहे, पण गावबंदी करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, जेव्हा गरज होती तेव्हा आरक्षण स्वीकारले आणि फायदा घेत शिक्षण आणि इतर लाभ मिळवले. आरक्षणाचा फायदा झाल्यानंतर ते सोडून द्यावे. एससी, एसटी, एनटी, ओबीसी वर्गातील असला तरी आर्थिक स्तर सुधारलेल्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये, असेही सुशील कुमार शिंदे म्हणाले.

लोकसभा लढणार नाही

मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. मात्र प्रणिती शिंदे हिचे नाव सुचवले आहे. परंतु अंतिम निर्णय हायकमांड घेईल, असेही सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले.