नारायण राणे यांना जोरदार हादरा, सतीश सावंत यांचा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा

2060

गेले काही दिवस नारायण राणेंच्या महराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्ग जिह्यात शिवसेनेने जणू सुरुंग लावला असतानाच सोमवारी नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रामराम ठोकत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपल्या कणकवली कलमठ येथील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यामुळे राणेंचे कणकवलीत असलेले अस्तित्व आता संपुष्टात आलेले आहे.

सावंत म्हणाले, गेले काही महिने मला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातील महत्त्वाच्या निर्णयापासून डावलले जात होते. आमदार नितेश राणे यांनी तर तुम्ही माझ्या कणकवली मतदारसंघात ढवळाढवळ करता, असाही प्रश्न केला होता. याखेरीज नारायण राणे हे भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत. पण मला कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यास सांगण्यात  आले. गेली 24 वर्षे पक्षासाठी काम केल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे हे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला रुचणारे नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून मी राणेंपासून फारकत घेत आहे. आजच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. माझी पुढील राजकीय भूमिका आठ ते दहा दिवसांत निश्चित होईल, तसेच मला अपेक्षित असलेला सिंधुदुर्ग जिह्याचा विकास करण्यासाठी जो पक्ष साथ देईल त्या पक्षात आपण निश्चितपणे जाऊ, अशी ग्वाहीदेखील सतीश सावंत यांनी दिली.

माझ्या विचारांचा सन्मान करणार्‍यांसोबत पुढे जाणार

सावंत म्हणाले, राणेंनी माझ्यावर कायमच विश्वास दाखवला होता. त्यामुळे गेली 24 वर्षे मी त्यांना साथ दिली. राणेंच्या पडत्या काळात अनेक शिलेदार त्यांना सोडून गेले. मात्र मी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलो होतो. आज राणे सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. मात्र माझ्याविषयी त्यांच्या मनात गैरसमज झालेले आहेत. किंबहुना काही लोकांनी गैरसमज पसरवून दिलेले आहेत. त्यामुळेच गेले काही महिने माझ्याविषयी उगाच वावड्या उठवल्या जात आहेत. मी ‘मातोश्री’वर गेलो नसतानाही केवळ संशयामुळेच माझ्या घरी राणेंनी माणूस पाठवला होता. मी राणेंच्या कुटुंबाचा घटक होतो. राणेंनी हक्काने माझ्याकडे या गोष्टींची विचारणा न करता ठामपणे चुकीची माहिती पुरविणार्‍यांना उत्तर देणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने तसे राणेंकडून झाले नाही. एकूणच या परिस्थितीमुळे मला वेगळा विचार करण्यास भाग पाडले असल्याने माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन मी माझी राजकीय वाटचाल माझ्या विचारांना सन्मान देणार्‍यांसोबत पुढे चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या