विशेष – कालातीत स्वामी विवेकानंद!

>> राहुल गोखले
[email protected]

भ्रष्टाचारापासून अन्यायापर्यंत अनेक समस्यांना निर्भयपणे भिडतील अशा तरुणाईची निकड असा अर्थ आपल्या विचारांतून प्रतीत करणारे स्वामी विवेकानंद. कालातीत विचार असणाऱ्या विवेकानंदांची जयंती (12 जानेवारी) राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी केली जाते.

प्रत्येक पिढीतील तरुणांसमोर त्याअगोदरच्या पिढीपेक्षा निराळी आव्हाने असतात. त्यांना तोंड देण्यासाठी त्या त्या पिढीला नवनवीन उपाय शोधावे लागतात; परंतु पिढ्या बदलल्या तरी माणूस व समाज म्हणून म्हणून काही मूल्ये शाश्वत असतात. अशा मूल्यांची जाणीव महापुरुषांच्या जीवनातून होत असते. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. स्वत स्वामी विवेकानंद यांना अवघे 39 वर्षांचे आयुष्य लाभले. याचा अर्थ त्यांनी केलेले सर्व उत्तुंग कार्य हे त्यांनी आपल्या तरुणपणातच केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतील वैशिष्टय़ म्हणजे, त्यांतील कालातीतपणा. कधी पत्रातून, कधी भाषणातून, कधी संभाषणातून त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरतात. मुख्य म्हणजे, कोणत्याही काळातील तरुणांना केवळ विचारप्रवृत्त नव्हे, तर कार्यप्रवृत्त करतात.

आज भारत एका गुंतागुंतीच्या तिठय़ावर उभा आहे. वेगवान आर्थिक वाढीसोबतच खोलवर रुजलेली सामाजिक विषमता, तांत्रिक प्रगतीसोबत नैतिक चिंता, राष्ट्रीय अभिमान व सामाजिक सलोखा यांच्यातील द्वंद्व अशा विरोधाभासांना सामोरे जाताना स्वामी विवेकानंदांचे विचार केवळ प्रेरणाच देत नाहीत, तर व्यावहारिक मार्गदर्शनही करतात. त्यांच्या मृत्यूनंतर एका शतकाहून अधिक काळ लोटला असला तरी, भारताच्या समकालीन आव्हानांना समजून घेण्यासाठी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी विवेकानंद हे आजही महत्त्वाच्या विचारवंतांपैकी एक आहेत.

स्वामी विवेकानंदांनी भारताचे केलेले निदान अस्वस्थ करणारे होते. ‘भारताचा राष्ट्रीय रोग म्हणजे दुर्बलता’, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. दुर्बलता म्हणजे संसाधनांची कमतरता नव्हे, तर आत्मविश्वास, धैर्य आणि नैतिक स्पष्टतेचा अभाव, असे त्यांना अभिप्रेत होते. आपल्या देशाला पोलादी कण्याची गरज आहे असे ते म्हणत. आताच्या काळात त्याचा अर्थ लावायचा तर भ्रष्टाचारापासून अन्यायापर्यंत अनेक समस्यांना निर्भयपणे भिडतील अशा तरुणाईची निकड त्यातून प्रतीत होते. मनुष्य घडवणारे शिक्षण संकल्पनेतून त्यांनी जीवनमूल्यांचे शिक्षण देणाऱया व्यवस्थेची गरज अधोरेखित केली होती.

विवेकानंदांचा अंधश्रद्धा आणि रूढीवादाला असलेला नकारही तितकाच समर्पक. ज्योतिष, चमत्कार आणि कर्मकांडांवरील अंधश्रद्धा व्यक्ती आणि राष्ट्र दोघांनाही दुर्बल करते असा इशारा त्यांनी दिला होता. एका पत्रात रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र लिहिताना त्यात चमत्कारांना स्थान असता कामा नये असे ते स्पष्टपणे लिहितात. चुकीच्या माहितीचा प्रसार, श्रद्धेचे व्यापारीकरण होत असणाऱ्या काळात धर्माला विवेकाच्या कसोटीवर उतरलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह अंतर्मुख करतो. विवेकानंदांनी विज्ञान आणि धर्म यांना एकमेकांचे शत्रू मानले नाही. दोन्ही सत्य शोधण्याचे पूरक मार्ग आहेत अशी त्यांची धारणा होती. धर्म नावाची व्यवस्था उधळून लावून धार्मिक सुधारणा करता येणार नाहीत; आणि तसे ज्यांनी केले त्यांच्या पदरी अपयश आले असे त्यांनी 2 नोव्हेंबर 1893 रोजी अलसिंग पेरुमल यांना शिकागो येथून लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. हे संतुलन आज महत्त्वाचे. कारण वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे नैतिक आणि अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत, ज्यांची उत्तरे केवळ विज्ञान देऊ शकलेच असे नाही.

विवेकानंदांचा राष्ट्रवादही सर्वात गरीब लोकाविषयीच्या करुणेवर आधारित होता. ‘जोपर्यंत कोटय़वधी लोक भूक आणि अज्ञानात जगत आहेत, तोपर्यंत मी प्रत्येक माणसाला देशद्रोही मानतो’, असे स्वामी विवेकानंद परखडपणे म्हणतात तेव्हा त्यातील मर्म जाणून घेतले पाहिजे. ‘मानवाची सेवा हीच ईश्वरसेवा’ ही त्यांची प्रसिद्ध घोषणा राष्ट्रवादाला समाजातील सर्वात दुर्बळ घटकांप्रति जबाबदारीशी जोडते. सर्वसामान्यांसाठी सन्मान आणि संधी हा राष्ट्रनिर्माणाचा खरा अर्थ त्यांना अभिप्रेत होता.

‘उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’, हे स्वामी विवेकानंदांचे आवाहन प्रयत्न, शिस्त आणि सेवावृत्ती यांनाच केलेले आवाहन होते. वाढत्या निराशावादाने आणि अलिप्ततेने ग्रासलेल्या समाजात वैयक्तिक जबाबदारीवर आणि त्यातही तरुणांकडून केलेल्या अपेक्षेवर दिलेला हा भर प्रेरक. सार्वजनिक चर्चा निराशा आणि उन्मादाच्या दरम्यान हेलकावे खात असलेल्या काळात त्यांचे विचार दिशादर्शक ठरतात. अहंकाराशिवाय आत्मविश्वास, अंधश्रद्धेशिवाय श्रद्धा आणि मानवी प्रतिष्ठेमध्ये रुजलेला राष्ट्रवाद हे स्वामी विवेकानंदांचे विचार समकालीन ठरतात यात शंका नाही.
(लेखक आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत.)