स्वप्नील गुगळेचे दमदार शतक, पहिला दिवस महाराष्ट्राचा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाला रणजी क्रिकेट स्पर्धेत आपल्या प्रतिमेला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि आता धवल कुलकर्णी या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईची घसरण दिसून येत आहे. मुंबई व महाराष्ट्र यांच्यामध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दिवशी यजमान संघाने वर्चस्व गाजवले. सलामीवीर स्वप्नील गुगळेचे शानदार शतक (101) आणि चिराग खुराना (71) व जय पांडे (नाबाद 68) यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर महाराष्ट्राने एलिट अ गटातील लढतीत 3 बाद 298 धावा फटकावल्या.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्वप्नील गुगळे व चिराग खुराना या सलामी जोडीने 146 धावांची सणसणीत भागीदारी केली. या दरम्यान दोघांच्या दमदार खेळींसमोर मुंबईच्या युवा गोलंदाजांची डाळ शिजली नाही. अखेर शुभम रांजणे याने चिराग खुरानाला 71 धावांवर बाद केले. या खेळीत त्याने 12 चौकार चोपून काढले. त्यानंतर स्वप्नील गुगळेने जय पांडेच्या साथीने महाराष्ट्राच्या धावसंख्येत भर टाकली. स्वप्नील गुगळे याने 15 चौकारांसह 101 धावांची खेळी केली. शुभम रांजणेच्याच गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला.

जय पांडेने सुरुवातीला नौशाद शेख (23 धावा) व त्यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठी (नाबाद 25 धावा) याच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मुंबईच्या गोलंदाजांना पहिल्या दिवशी आपला ठसा उमटवता आला नाही.