स्वरा भास्करविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कोर्टात याचिका

1746

आपल्या विधानांनी नेहमी वाद ओढवून घेणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. कारण, तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल झाली आहे. तिने केलेल्या काही चिथावणीखोर वक्तव्यांमुळे तिच्याविरोधात ही याचिका दाखल झाली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वरिष्ठ अधिवक्ता विजय बख्शी यांनी ही याचिका कानपूर येथील कोर्टात दाखल केली आहे. यासाठी त्यांनी यूट्युबवरील काही व्हिडीओ पुराव्यादाखल दिले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, स्वराविरोधात आयपीसी 124 ए, 153 ए, 153 बी आणि 505 (2) अन्वये देशद्रोहाचा खटला चालवावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेसाठी जे व्हिडीओ देण्यात आले आहेत. त्यातील काही व्हिडीओमध्ये स्वरा दोन गटांमध्ये तणाव निर्माण होईल, इतपत चिथावणीखोर भाषण करत असल्याचं बख्शी यांचं म्हणणं आहे.

सीआरपीसीच्या कलम 200 अन्वये या खटल्यातील वादी अर्थात बख्शी यांना मॅजिस्ट्रेटसमोर आपला जबाब नोंदवावा लागेल. त्यानंतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील. त्यानंतर हा देशद्रोहाचा खटला पुढे चालवावा अशी मागणी करणार असल्याचं बख्शी यांचं म्हणणं आहे.

अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायम तिच्या बोल्ड सिन्ससोबतच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. स्वराने वीरे दी वेडिंग सिनेमात दिलेल्या हस्तमैथुनाच्या सीनवरून मोठा वाद निर्माण झाला होता. नेटकऱ्यांनी तिच्या त्या बोल्ड सिनवरून तिला बरीच खरी खोटी सुनावली होती. स्वराच्या चित्रपटांवरूनच नाही तर तिच्या राजकीय वक्तव्यांवरून देखील ती बऱ्याचदा वादात अडकली आहे. त्यामुळे स्वरा भास्करसाठी सोशल मीडियावर ट्रोल होणे हे काही नवे राहिलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या