फर्स्ट टेक – अभिनयासाठी सीएचा ट्रॅक बदलला

स्वरा सावंत

विद्यार्थी म्हणून प्रगल्भ होतच होते, पण कलाकार म्हणून घडवण्यातही माझी शाळा पार्ले टिळक विद्यालयाचा मोठा वाटा आहे. संस्कृत शिकवणाऱया शिक्षिका रजनी वेलणकर मॅडम यांनी नाटकात अभिनय करण्यासाठी मला वळवलं. ते आवडलं, भावलं, आणि पुढे जाऊन मला मोनो अॅक्ट करण्याची संधी मिळाली. स्टेजवर जाऊन कसं वावरायचं हे इथे कळले आणि एक अनाहुत भीती होती ती दूर झाली. पोद्दार कॉलेजमध्ये सीए होण्यासाठी गेले, पण डिग्रीला आल्यानंतर कल्चरल ऑक्टिव्हिटी रिहर्सल वाढत गेल्या, मग शेवटी ती वेळ आली की ठरवावे लागले की पुढे काय करावे. अभिनय क्षेत्रात करिअर करायचंय असं ठरलं आणि मी सीएचा मार्ग बदलला.

शेवटच्या वर्षी ऑडिशनला सुरुवात केली. स्टडी पॅमेरा पाहून काही वाटलं नाही, पण पहिल्या मालिकेचा शूटिंगचा पहिला दिवस आजही स्मरणात आहे. दुहेरी मालिका आणि समोर संजय जाधव दिग्दर्शक… अगदीच आदरयुक्त भीती. त्यात सगळे ज्येष्ठ सहकलाकार. ओएस काय आणि आरओसी काय सगळं डोक्यावर जात होते, पोटात भीतीचा गोळा होता. पण सगळ्यांनी सामावून घेतले आणि ही नय्या पार झाली. सध्या माझी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रत्येक कामात काही ना काही शिकण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करत आहे.

शाळेत अभ्यासाबरोबरच नाटय़ स्पर्धांमध्ये भाग घेतला. शिक्षकांचे मार्गदर्शन इतके होते की, पुढेही अभिनयासाठी वेगळा क्लास वैगरे लावण्याची गरज नाही भासली. सीए होण्याचं स्वप्न बाळगत मी पोद्दार कॉलेजमध्ये आले खरं, पण इथल्या कल्चरल ऑक्टिव्हिटीने माझ्यातल्या कलाकाराला शोधायला मदत केली, आपल्या कलाप्रवासाविषयी सांगतेय, अभिनेत्री अमृता पवार.

मित्रमैत्रिणींची सकारात्मक ऊर्जा

आतापर्यंत चार मालिका झाल्या. एक काम पूर्ण झाल्यावर दुसरं काम सुरू होण्याचा काळ खूप महत्त्वाचा असतो. या काळात सगळं नीट होईल ही ऊर्जा मला कायम माझ्या शाळेतील मित्रमैत्रिणीच्या ग्रुपने दिली आहे. हे क्षेत्र खूप अनसर्टन आहे त्यामुळे आपला हौसला कुठे कमी नाही पडणार याची काळजी मित्र घेतात.

पालकांचा हट्ट, प्लॅन बी मस्ट!

या क्षेत्रात येण्याचं ठरवलं आणि घरी सांगितले. आधी बाबांचा हट्ट होता की डिग्री पूर्ण कर. मला कधीही काही करण्यापासून रोखलेले नाही. पण पुढे जाऊन काही अडचण येऊ नये यासाठी प्लॅन बी पण हवा, असे ते कायम सांगतात.