कहाणी स्वस्तिकची

>> मंगल गोगटे

स्वस्तिक हे चिन्ह आपल्या हिंदू धर्मासाठी जसे शुभकारक आहे तसे इतरही काही संस्कृतींमध्ये पुरातन काळापासून हे चिन्ह महत्त्वाचे मानले गेले आहे. अर्थात हिटलरच्या काळात हेच चिन्ह तिरस्काराच्या फेऱ्यातही सापडले. स्वस्तिकची ही कहाणी ऐतिहासिक आहे.

स्वस्तिकला शुभचिन्ह मानण्यापासून ते 19व्या शतकात त्याचा तिरस्कार करण्यापर्यंतचा बदल कसा झाला ही ऐतिहासिक कहाणी आहे आणि याची सुरुवात झाली टकातील हिसार्लीक इथे. पुराणवस्तू संशोधक हेन्रीच श्लिमन यांनी ती ट्रोयची जागा (the site of Troy) आहे असं समजून तिथे संशोधनासाठी उत्खनन चालू केलं. तिथे अनेक कलाकृतींवर स्वस्तिकचं चिन्ह आढळलं आणि सहाव्या शतकात सापडलेल्या मातीच्या भांडय़ांवर असलेल्या कलापृतींसारखेच असल्याने त्यांना ते इतिहासपूर्व काळातील महत्त्वाचं धार्मिक चिन्ह वाटलं.

श्लिमनच्या उत्खननाच्या व त्यातील स्वस्तिकबाबतच्या बातम्या सर्वदूर पसरतच होत्या. हळूहळू स्वस्तिक हे सर्वव्यापी चिन्ह बनलं. पूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेत ते सगळ्या ठिकाणी दिसू लागलं- जाहिरातीत, इमारतींवर, बॅजेस आणि मेडल्सवर शिवाय खेळातील टीम्सनी स्वस्तिक नाव घेतलं वा ते आपलं चिन्ह म्हणून स्वीकार केलं. हे सगळं चांगल्या नशिबासाठी आणि यशस्वी होण्यासाठी.

अॅडॉल्फ हिटलरला हे चिन्ह एवढं आवडलं की त्याने ते आपल्या नाझी पार्टीसाठी घेतलं आणि मग सगळे नाझी लाल झेंडे त्यावर पांढऱ्या गोलात स्वस्तिक मिरवू लागले. ज्यावेळी तिसरी सत्ता (Third Reich) युद्धावर मार्च करत निघाली त्यानंतर हे काळं स्वस्तिक तिरस्कार, भीती, वांशिक असहिष्णुता आणि नरसंहार यांचं प्रतीक झालं.

स्वस्तिकचं सगळ्यात जुनं उदाहरण 15000 वर्षांपूर्वीचं आहे. 1908 मध्ये युक्रेन इथे एक मोठय़ा हत्तीच्या दाताचं कोरीव काम करून तयार झालेल्या एका पक्ष्यावर जोडलेल्या स्वस्तिकाचं बारीक काम केलेलं मिळालं. स्वस्तिक हे चिन्ह बहुतेक आकाशातील एका कॉमेटवरून बनवलेलं असावं.

नंतरच्या काही वर्षांत हे चिन्ह भ्रष्ट झालं आणि ते असंख्य संस्कृतींनी सहस्राब्दी वर्षं वापरलं, परंतु ते नेहमीच आशा व सकारात्मता याचं दर्शक राहिलं. ते श्रीमंतीचं वा सूर्याचं प्रतीक म्हणून अथवा दिव्यत्वाची प्रचीती मिळण्यासाठी वा शुभसंकेत मिळवण्यासाठी वापरलं गेलं. स्वस्तिक हा मूळचा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘कल्याणास अनुकूल’ असा आहे.

पूर्व युरोपातसुद्धा विंका संस्कृतीमध्ये सुमारे 7000 वर्षांपूर्वी नवपाषाण युगात एक स्वस्तिक कोरलं जात होतं. नंतर कांस्य युगात तर ते मोठय़ा प्रमाणात वापरलं जाऊ लागलं. पुरातन ग्रीक लोकांसाठी स्वस्तिक हे सूर्याचं प्रतीक होतं तर मेसापोटेमियात ते नाण्यांवर छापलं जाऊ लागलं. ग्रीसमध्ये ते कपडे व फुलदाण्यांवर दिसू लागलं तर रोममधे मोझेक कलाकृतीत.

लोहयुगात 27 प्रकारची स्वस्तिकची डिझाइन्स ढालींवर दिसतात. पण लंडनमध्ये हे डिझाइन ख्रिस्तपूर्व 2000पासून वापरलं जातंय. संपूर्ण युरोपभर ‘ऊर्जा उत्सर्जित करणारं’ स्वस्तिक धार्मिक प्रतिमांमध्ये समाविष्ट केलं गेलं. ख्रिस्ताचा मृत्यूवर विजय दाखवण्यासाठी हुकवर लटकलेला क्रॉस सुरुवातीच्या ख्रिश्चन कलापृतींमधे दिसतो. मध्ययुगीन काळातही चर्चच्या सजावटीत व कपडय़ांवर स्वस्तिक वापरलेलं दिसतं. (जसं स्लाव राजकुमारीच्या कपडय़ांवर बघायला मिळतं.)

दुसऱ्या महायुद्धानंतर स्वस्तिकच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी आली आणि ते बेकायदेशीर झालं. अमेरिकेत मात्र ते वापरता येतं. अलीकडच्या काळात स्वस्तिक असणारे झेंडे आणि ग्राफिटी वाढली आहे, जेव्हापासून नाझीसदृश्य लोक व्हर्जिनियातील शार्लोटवील येथे 2017 मध्ये मोर्चे घेऊन गेले.

हिंदुस्थानात सगळीकडे स्वस्तिक दिसतं, अगदी मंदिरांच्या प्रवेशद्वारांपासून ते टॅक्सींपर्यंत. तसंच समारंभांपासून ते सणांपर्यंत सगळीकडे त्याची महत्त्वाची भूमिका असते. दिवाळीतही स्वस्तिक रांगोळ्यांमध्ये दिसतं. अंधारावर उजेडाचा विजय दाखवणाऱया आकाश कंदिलांमध्येही ते दिसतं. ज्यावेळी जर्मन राजकारण्यांनी युरोपियन युनियनमध्ये स्वस्तिकवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा हिंदूंनी धार्मिक कारणे देऊन त्याचा जोरदारपणे विरोध केला.

स्वस्तिकवर असलेला नाझींचा पगडा दूर करता येऊन अगदी पूर्णपणे पुसून टाकता येऊन त्याला पूर्वीप्रमाणेच फक्त शुभ गोष्टींचा कारक समजता येईल का, हा एक मोठा प्रश्न आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या