
सामना प्रतिनिधी । पुणे
जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून तब्बल पाच लाख नागरिकांची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली आहे, तर त्यातील ३७६ संशयित रुग्णांना टॅमीफ्लू गोळ्या देऊन उपचार करण्यात आले आहेत. तसेच, संसर्ग वाढू नये, यासाठी संशयित रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी, याबाबतही डॉक्टरांकडून समुपदेशन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात दोन, तर सप्टेंबर महिन्यात पाच रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यु झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले. आत्तापर्यंत ४० स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. गतवर्षी वर्षभरात १८८ रुग्ण आढळून आले असून, ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने फ्लूचा वाढता उद्रेक लक्षात घेता जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये समुपदेशन केंद्र उभारले आहे. तसेच, ज्या गावातील रुग्ण दगावला आहे, त्या गावाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. नागरिकांमध्ये जनजागृती करून गावात स्वच्छता आणि औषध फवारणी करण्यात येत आहे.
१ जानेवारी ते २५ सप्टेंबर दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रावर ४ लाख ७३ हजार ४५८ व्यक्तींची स्वाइन फ्लू तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३७६ व्यक्ती संशयित म्हणून आढळले. त्यांना तत्काळ टॅमीफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तसेच, आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आलेल्या पथकांनी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी स्वत: बारामती, उरुळी कांचन, पुरंदर यांसह अन्य तालुक्यांतील काही गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्दी, खोकला, ताप असेल तर तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, तर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र स्तरावर समन्वय ठेवून सर्वेक्षण करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिला आहे.
दरम्यान, सर्दी, ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. स्वाइन फ्लू संशयित किंवा सोमवारीार झालेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, घरातल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी; तसेच नागरिकांनी घराबाहेर पडताना थोंडाला रुमाल किंवा मास्क बांधून बाहेर पडावे, वेळोवेळी स्वच्छ हात धुवावेत, जेणेकरून स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले आहे.






























































