
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला असताना अचानक झालेल्या बॉम्बस्फोटाने 40 निष्पापांचे जीव घेतले. स्वित्झर्लंडच्या क्रांस मोंटाना शहरात ही धक्कादायक घटना घडली. तेथील अल्पाईन स्की रिसॉर्टमध्ये शेकडो लोक उपस्थित होते. स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्वित्झर्लंडच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 1.30 वाजता स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाले आहेत. क्रांस मोंटाना शहर हे नो-फ्लाय झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून पोलीस व आपत्कालीन विभागाची पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. क्रांस मोटाना शहर हे इंटरलाकेन या प्रसिद्ध पर्यटनस्थळापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. पॅराग्लायडिंग, स्कीईंग आणि ट्रेकिंगसाठी जगभरातून पर्यटक तेथे दाखल होतात. क्रांस मोंटाना स्वित्झर्लंडच्या सर्वात महागडय़ा आणि आलिशान भागांपैकी एक आहे.
स्फोटामागील कारण अस्पष्ट
हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा तपास सुरू असून बचाव कार्यास प्राधान्य दिले जात आहे, असे स्विस पोलीस प्रवत्ते गाएतान लाथियो यांनी सांगितले. आतषबाजीमुळे हा स्फोट झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





























































