बारावी सायन्सच्या `डुप्लिकेट’ पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ, ग्राहक पंचायत महाराष्ट्रची चौकशीची मागणी

314

बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांची पुस्तके आता बाजारात मिळू लागली आहेत. मात्र ती पुस्तके डुप्लिकेट असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ही डुप्लिकेट पुस्तके छापणाऱ्या व विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील पुस्तक दुकानात शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सुरुवात झाल्यापासून इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स, केमिस्ट्री व बायोलॉजी इत्यादी विषयांच्या डुप्लिकेट पुस्तकांची सर्रास विक्री सुरू चालू असल्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या निदर्शनास आले आहे. अशा पुस्तकांची आपल्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात विक्री होत असण्याची शक्यता असल्यानेच ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन ही डुप्लिकेट पुस्तके जप्त करावीत. तसेच संब्ंधितांवर कॉपीराइट कायद्यान्वये शिक्षेची कार्यवाही करावी, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. तसेच अध्यक्ष, बालभारती, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सिंधुदुर्ग यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची आर्थिक लूट आणि शैक्षणिक नुकसान
बारावी विज्ञान शाखेच्या या पुस्तकांमधील कागदाची प्रत, अभ्यासक्रम, सदोष मुद्रण व पुस्तके मुद्रण छपाई करणाऱ्याचे नाव पुस्तकात छापलेले नाही. यावरून ही पुस्तके डुप्लिकेट आहेत ते सहज लक्षात येते. या डुप्लिकेट पुस्तकांमुळे बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांची आर्थिक लूट तर होतच आहे पण त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या