
>> क्रीडा प्रतिनिधी
फुटबॉलची भूमी असलेल्या इटलीने आता क्रिकेटमध्येही फटकेबाजी सुरू केली. त्यांनी जस्टिन आणि अँथनी या मोस्का बंधूच्या झंझावाताने नेपाळचा दहा विकेटनी धुव्वा उडवत क्रिकेटच्या वर्ल्ड कपमधील पहिलावहिला शंभर नंबरी विजय नोंदवत इतिहास घडवला. या विजयामुळे त्यांचे सुपर एटमधील आव्हानही जिवंत राहिले असून आगामी इंग्लंड किंवा विंडीजविरुद्ध धक्कादायक विजयाची नोंद करण्यात इटली यशस्वी ठरली तर ते थेट सुपर एटमध्येही धडक मारू शकतात. क्रिकेटच्या या वेगवान फॉरमॅटमध्ये कोणताही संघ छोटा किंवा मोठा नसतो हे सहसदस्य संघांचा खेळ वारंवार दाखवून देतेय.
टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या इटलीने क्रिशान कालुगमागेच्या नेतृत्वाखाली सहजपणे खेळणाऱ्या नेपाळला 19.3 षटकांत 123 धावांत गुंडाळत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सामन्यापूर्वी नेपाळ हा इटलीला सहज नमवणार, असा साऱ्यांचा अंदाज होता, पण इटलीने सामन्याच्या प्रारंभापासूनच हे अंदाज चुकवायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीपासूनच नेपाळची गाडी रुळावर येऊ दिली नाही. त्यांनी 49 धावांत तीन विकेट्स टिपल्या आणि त्यानंतर नेपाळची पडझड सुरूच राहिली. आरिफ शेखचे 27 आणि करण केसीचे नाबाद 18 हेच दोघे अपवाद ठरले. क्रिशानने तीन, बेन मानेन्तीने दोन, तर अली हसन, जेजे स्मट्स आणि जसप्रीत सिंह यांनी प्रत्येकी एक विकेट घेत नेपाळच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्यानंतर ते उभे राहू शकले नाहीत.
विजयासाठी 124 धावांचे लक्ष्य पाहूनच इटालियन क्रिकेटच्या पीचवर इतिहास रचणार हे निश्चित होते. इटलीच्या मोस्का बंधूंनी नेपाळविरुद्ध जणू सरावाचा सामना खेळत असावा अशी जोरदार फलंदाजी करत हल्ला चढवला. अँथनीने 32 चेंडूंवर 62 नाबाद धावा ठोकताना तीन चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी केली, तर जस्टिनने 44 चेंडूंवर 60 नाबाद धावा ठोकल्या. 12.4 षटकांतच सामना इटलीने सामना संपवला. आपला पहिला विजय, तोसुद्धा एकही विकेट न गमावताच नोंदवत इटलीने इतिहास लिहिला.
सुपर एटचे द्वार उघडले
ग्रुप सीमध्ये दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव अशा दोन गुणांसह इटली तिसऱ्या स्थानावर आहे आणि सुपर एटची आशा जिवंत ठेवली आहे. इटलीने आगामी इंग्लंड किंवा वेस्ट इंडीजविरुद्ध एक जरी सनसनाटी विजय मिळवला तर ते आणखी एक इतिहास रचू शकतात. क्रिकेटविश्वही अशा सनसनाटी आणि थरारक विजयाची वाट पाहत आहे. नेपाळला मात्र सलग दुसऱ्या पराभवाने धक्का बसला आहे.
























































