सुपर एटवर अफगाणिस्तानचाच हक

अपेक्षेप्रमाणे अफगाणिस्तानच्या पठाण का बच्चा तुफान खेळला. फारुकीच्या भेदक माऱयापुढे पापुआ न्यू गिनीचा (पीएनजी) धुव्वा उडवत टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर एटवर आपलाच हक असल्याचे दाखवून दिले. अफगाणच्या विजयाच्या हॅटट्रिकमुळे न्यूझीलंडसारख्या दिग्गज संघावर साखळीतच बाद होण्याची नामुष्की ओढावली.

फझल हकची भेदक सुरुवात

आज अफगाणिस्तान आपल्या सुपर एट प्रवेशावर शिक्कामोर्तब करताना न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात येण्याची भीती होती ती खरी ठरली. राशीद खानने टॉस जिंकून पीएनजीला फलंदाजीची संधी दिली. फझलहक फारुकीने कर्णधार असाद वालाला धावचीत केल्यानंतर आपल्या दुसऱया षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर लेगा सियाका आणि सीसी बाऊला बाद करत पीएनजीचे पंबरडेच मोडले. 4 चेंडूंत सलग तीन धक्क्यांनी हादरलेला पीएनजी नंतर डोके वर काढू शकला नाही. मग नवीन हकने हिरी हिरी आणि टॉनी उरा यांचे त्रिफळे उडवत पीएनजीची 5 बाद 30 अशी दुर्दशा केली. त्यानंतर किपलिंग दोरिगाने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण चाड सोपर आणि नॉर्मन वानुआ हे दोघेही तीन धावांच्या अंतरात धावबाद झाल्याने पीएनजीने 50 धावांत आपले सात फलंदाज गमावले. मग दोरिगाने अलेई नाऊसोबत आठव्या विकेटसाठी 38 धावांची झुंजार भागी रचत संघाला 88 धावांपर्यंत नेले. मात्र दोरिगा बाद झाल्यानंतर पीएनजी डावही 95 धावांवर संपला. स्पर्धेत सर्वाधिक 12 विकेट घेणाऱया फारुकीने आज 14 धावांत 3 विकेट टिपले. तोच आजही विजयाचा शिल्पकार ठरला. गेल्या दोन सामन्यांत त्याने ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकला आहे. त्याने पहिल्या सामन्यात 5, दुसऱया सामन्यात 4 आणि आज 3 विकेट टिपले.

गुलाबदिनचा झंझावात

गेल्या दोन्ही सामन्यांत दमदार आणि जोरदार खेळ करणाऱया रहमानुल्लाह गुरबाज (11) आणि इब्राहिम झदरान (0) दोघेही लवकर बाद झाले, मात्र त्यानंतर गुलाबदिन नईबने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आधी ओमरझईबरोबर 33 धावांची भागी केली आणि मग मोहम्मद नबीसह 46 धावांची अभेद्य भागी रचत अफगाणिस्तानच्या दमदार विजयावर शिक्कामोर्तब केले. अफगाणचा संघ टी-20 स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दुसऱया फेरीत पोहोचला आहे.