टीम इंडियाने आयर्लंडला नमवत T20 World Cup 2024 ची दिमाखात सुरुवात केली. गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीमुळे आयर्लंडने दिलेले 97 धावांचे माफक लक्ष टीम इंडियाने 13 व्या षटकात पूर्ण केले. टीम इंडियाचा पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यासंदर्भात रोहित शर्माने मोठं विधान केले आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध पार पडला. या सामन्यात प्रथम गोलंदाजांनी आयर्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. आयर्लंडने दिलेले 97 धावांचे लक्ष टीम इंडियाने 8 विकेट राखत 13 व्या षटकातचं पूर्ण केले. IPL 2024 मध्ये टीकेचा धनी ठरलेल्या हार्दिक पंड्याने या सामन्यात भेदक गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. त्यामुळे आता हार्दिक पंड्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कर्णधार रोहित शर्माने 37 चेंडूंमध्ये 52 धावांची विस्फोटक खेळी केली मात्र जोश लिटिल च्या गोलंदाजीवर पुल शॉट मारताना चेंडू त्याच्या उजव्या हाताला लागल्यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले होते.
टीम इंडियाचा पुढील सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्ताविरुद्ध होणार आहे. हा सामना सुद्धा Nassau Cricket Stadium वर होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे सर्वच खेळाडू कसून सराव करत आहेत. आयर्लंडविरुद्ध सामना पार पाडल्यानंतर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला. “नवीन मैदान, नवीन ठिकाण असल्यामुळे आम्हाला इथे खेळताना कसे वाटते ते पाहायचे होते. खेळपट्टी अद्याप स्थिरावली नाही आणि गोलंदाजांना खूप मदत होत आहे,” अस रोहित शर्मा म्हणाला. गोलंदाजांसाठी पौष्टीक असणाऱ्या या खेळपट्टीवर टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या सामन्यात आठ विकेट घेतल्या.
पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची रणनीती काय असणार या संदर्भात रोहित शर्माने भाष्य केले. “खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी हे मला माहीत नाही. परंतू खेळपट्टी आज होती तशीच असेल हा विचार करुनच आम्ही तयारी करू. परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकुल आहे. त्यामुळे पुढील सामन्यात त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेट फिरकीपटू स्पर्धेमध्ये योग्य वेळी त्यांची भुमिका पार पाडतील. टीमच्या गरजेनुसार बदल केले जातील, ” अस म्हणत पुढील सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज असल्याचे संकेत रोहित शर्माने दिले आहेत.