सलग दोन विजयांमुळे ‘ड’ गटात अव्वल असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वप्रथम सुपर एटमध्ये स्थान मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे, तर बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा विजयरथ रोखण्याचे कडवे आव्हान बांगलादेश संघापुढे असेल. दक्षिण आफ्रिकेने नेदरलॅण्ड्स व श्रीलंका यांचा पराभव केला असला तरी माफक लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. खरे तर गोलंदाजीच्या जिवावर हे दोन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. बांगलादेशला चांगली फलंदाजी करून हा सामना जिंकण्याची संधी असेल.
बांगलादेशला समाधानकारक धावसंख्या उभारण्यासाठी एनरिक नॉर्किया, कगिसो रबाडा, मार्को यानसन व ओटनील बार्टमन या फॉर्मात असलेल्या दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांचा प्रतिकार करावा लागणार आहे. दुसरीकडे आघाडीच्या फळीचा फ्लॉप शो हा दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या चिंतेचा विषय आहे. नेदरलॅण्ड्ससारख्या लिंबूटिंबू संघाविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला 10 षटकांत 33 धावांत करता आल्या होत्या. ट्रिस्टन स्टब्ज व डेव्हिड मिलर यांनी किल्ला लढविला नसता तर कदाचित दक्षिण आफ्रिकेचा पराभवही झाला असता. अशा सुमार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला बांगलादेशविरुद्ध टी-20 क्रिकेटमधील आपली विजयाची परंपरा राखण्यासाठी सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे.
बांगलादेशने श्रीलंकासारख्या तगडय़ा संघावर रोमहर्षक विजय मिळवून टी-20 वर्ल्ड कपच्या अभियानास प्रारंभ केलेला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच त्यांच्याही फलंदाजांची कामगिरी समाधानकारक नाहीये. हिंदुस्थानविरुद्धचा सराव सामना असो किंवा श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना, यात श्रीलंकन फलंदाज चाचपडताना दिसले. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवायचा असेल तर लिटन दासप्रमाणेच इतर बांगलादेशी फलंदाजांना संघासाठी योगदान द्यावे लागणार आहे. शाकिब अल हसनच्या अष्टपैलू कामगिरीवरही बांगलादेशची मदार असेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणार, की श्रीलंका त्यांचा विजयरथ रोखणार याकडे अवघ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.
…तर गटात चुरस वाढेल
दक्षिण आफ्रिकेने विजयाची हॅटट्रिक केली तर त्यांचे सुपर एट स्थान जवळजवळ निश्चित होईल. मग दुसऱया स्थानासाठी नेपाळ, श्रीलंकेसह उर्वरित चारही संघांना संधी असेल. या गटातील दुसऱया संघाचे भवितव्य बांगलादेश-नेदरलॅण्ड्स यांच्यात 13 जूनला होणाऱया लढतीनंतर अधिक स्पष्ट होईल. या गटातून दोन संघ तीन सामने जिंकण्याची शक्यता असल्यामुळे आफ्रिकेचा सुपर एट प्रवेश सोमवारीच निश्चित होईल. पण बांगलादेशने विजय मिळविला तर सुपर एटची लढाई अधिक तीव्र होईल. मग कोणताही संघ सुपर एटचा दरवाजा ठोठावू शकेल.