एक टी-20 वर्ल्ड कपचा जगज्जेता आणि दुसरा वन डे क्रिकेटचा चॅम्पियन म्हणजेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तुल्यबळ लढत आज रंगेल. ऑस्ट्रेलियाने ओमानविरुद्ध आपले विजयी अभियान सुरू केले होते, तर इंग्लंडविरुद्धचे यश त्यांना सुपर एटचे दरवाजे उघडून देईल. मात्र आपला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे इंग्लंडला आपले आव्हान मजबूत करण्यासाठी विजयाचे खाते उघडावेच लागेल.
ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलियाला फार मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. मात्र डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टॉयनिस यांच्या जोरदार खेळाने ऑस्ट्रेलियाला सहजसुंदर विजय मिळवून दिला होता. या सामन्यात ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल धावा करण्यात अपयशी ठरले होते. उद्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आघाडीच्या फलंदाजांकडून घणाघाती फलंदाजीची अपेक्षा आहे. दुसरीकडे इंग्लंडला स्कॉटलंडविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नव्हती आणि त्यांच्या गोलंदाजांना एकही विकेट टिपता आली नव्हती. त्यामुळे मार्क वुड, जोफ्रा आर्चरला आपला भेदक मारा करावाच लागेल. तसेच आदिल राशीद आणि मोईन अलीची फिरकीही कमाल दाखवू शकते. फलंदाजीत जोस बटलर आणि फिल सॉल्टला आपला आयपीएलचा धमाका ब्रिजटाऊनमध्येही करण्याची वेळ आलीय.
न्यूझीलंड अफगाणशी भिडणार
प्रोव्हिडन्स- न्यूझीलंड आपला पहिलाच सामना खेळणार असून त्यांच्यापुढे अफगाणिस्तानचे आव्हान आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानचे मनोधैर्य उंचावलेले असून न्यूझीलंडला धक्का दिल्यास त्यांना सुपर एटचा मार्गही सोयीस्कर होईल. न्यूझीलंडलाही स्पर्धेत आपले स्थान भक्कम करण्यासाठी विजयी सलामी देणे गरजेचे आहे. ‘क’ गटात यजमान वेस्ट इंडीजचाही संघ तगडा असल्यामुळे सुपर एटमध्ये स्थान मिळवण्यासाठी या तिन्ही संघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पराभवाचा बदला
गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलॅण्ड्स दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला होता. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी उद्या दक्षिण आफ्रिका मैदानात उतरणार आहे. आफ्रिकेने लंकेविरुद्ध विजयी सलामी दिल्यामुळे डचला हरवून ते सुपर एटमधील आपला प्रवेश निश्चित करण्याच्या दिशेने दुसरे पाऊल टाकू शकतात.