
मुंबईने देशांतर्गत स्पर्धांमध्ये असलेला आपला दबदबा पुन्हा एकदा दाखवताना सय्यद मुश्ताक अली करंडकावरही आपलेच नाव कोरले. मुंबईने या वर्षी रणजी करंडकापाठोपाठ इराणी करंडकही जिंकला आणि आता झंझावाती टी-20 स्पर्धेतही अजिंक्य होण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे अजिंक्य रहाणेने रणजी करंडक आणि इराणी करंडक स्पर्धा आपल्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या तर अली करंडक त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर जिंकून दिला. पाच अर्धशतकांसह स्पर्धेत सर्वाधिक 469 धावा करणारा अजिंक्यच ‘मालिकावीर’ ठरला.
देशांतर्गत टी-20 क्रिकेटची सर्वात लोकप्रिय असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱया सामन्यात मुंबईला केरळकडून 43 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर अजिंक्यने एकापेक्षा एक झंझावाती खेळी करत मुंबईला दणदणीत विजय मिळवून दिले. आज मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शार्दुल ठाकूरने आपल्या पहिल्याच षटकातील चार चेंडूंत अर्पित गौड (3) आणि हर्ष गवळी (2) याची विकेट घेत खळबळ माजवली. नऊ षटकांत अवघ्या 54 धावांत 4 फलंदाज बाद झाल्यामुळे मध्य प्रदेशची फलंदाजी तणावाखाली वावरत होती. तेव्हा मध्य प्रदेशचा डावाला एकटय़ा कर्णधार रजत पाटीदारच्या फटकेबाजीने मजबुती दिली. रजतचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज विशीच्या पुढे जाऊ शकला नाही. तरीही रजतने 40 चेंडूंत 6 चौकार आणि 6 षटकारांची फटकेबाजी करीत संघाला अनपेक्षितपणे 174 पर्यंत पोहोचवले.
अजिंक्यचा झंझावात कायम
गेल्या सात डावांत 13, 52, 68, 22, 95, 84, 98 अशा झंझावाती खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने आजही 37 धावांची खेळी करताना सूर्यकुमार यादवबरोबर 52 धावांची भागी रचत मुंबईला विजयपथावर नेले. पृथ्वी शॉने आजही निराशा केली असली तरी अजिंक्य-श्रेयस अय्यरने 32 धावांची भागी रचली. अजिंक्यनंतर सूर्यकुमारची बॅट तळपली आणि त्याने 3 षटकार ठोकत मुंबईचा विजय सोप्पा केला. 32 चेंडूंत 46 धावांची गरज असताना आलेल्या सूर्यांश शेडगेने आपली घणाघाती फलंदाजी पुन्हा दाखवत 15 चेंडूंत 36 धावा चोपताना मुंबईला 13 चेंडू आधीच विजय मिळवून दिला. त्याने अथर्व अंकोलेकरबरोबर 19 चेंडूंत 51 धावांची अभेद्य भागी रचली.
मुंबईची जेतेपदाची हॅटट्रिक
मुंबईने दोन वर्षांनंतर मुश्ताक अली करंडकावर आपली मोहोर उमटवली असली तरी या वर्षी त्याने जेतेपदाची अनोखी हॅटट्रिक केली आहे. या वर्षाच्या प्रारंभी त्यांनी विदर्भाला नमवत रणजी विजेतेपद संपादले. मुंबईने या विजयासह आपला आठ वर्षांचा रणजी दुष्काळही संपवला होता. तसेच शेष हिंदुस्थानचा पराभव करत तब्बल 27 वर्षांनंतर इराणी करंडक जिंकण्याचा पराक्रमही मुंबईने याच वर्षी केला आहे आणि आता सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकून त्यांनी जेतेपदाची अनोखी हॅटट्रिक केली. या देशांतर्गत वेगवान क्रिकेटमध्ये मुंबईला फारसे चांगले करता आले नव्हते. मात्र 2022 साली त्यांनी हिमाचल प्रदेशचा पराभव करत आपले पहिलवहिले जेतेपद जिंकले होते आणि आता तीन वर्षांत त्याची पुनरावृत्ती करून दाखवली.
पृथ्वीचा अपयशी शेवट
रणजी संघातून वगळण्यात आलेल्या पृथ्वी शॉला आयपीएलमध्ये प्रथमच भाव मिळाला नाही. त्यामुळे खचलेल्या पृथ्वीला आपल्या बॅटमध्ये असलेली धमक मुश्ताक अली करंडकात दाखवण्याची नामी संधी होती, पण तो या स्पर्धेत पूर्णतः अपयशी ठरला. त्याला मुंबईने वारंवार संधी दिली, पण त्याला एकाही सामन्यात पन्नाशीही गाठता आली नाही. त्याने या स्पर्धेत 10, 8, 49, 34, 0, 40, 23, 0, 33 अशा खेळी केल्या आहेत. त्यामुळे अपयशी पृथ्वीला रणजी संघात आणि आयपीएलमध्ये स्थान मिळवण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागणार आहे.