सूर्यकुमार यादवच्या झंझावातानंतर जसप्रीत बुमराच्या भेदक माऱयापुढे अफगाणिस्तानला नतमस्तक व्हावे लागले. परिणामतः सुपर एटच्या पहिल्या साखळी सामन्यात हिंदुस्थानने घातक भासणाऱया अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीसाठी गयाना आपणच गाठणार असल्याचे संकेतही दिले.
साखळी सामन्यात जोरदार कामगिरी करणाऱया अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकी आणि राशीद खानने आजही हिंदुस्थानी दिग्गजांना सतावले होते. त्यामुळे सामना चुरशीचा होईल, असे वाटत होते. पण बुमराच्या माऱयापुढे अफगाणी फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे हिंदुस्थानने सुरुवातीलाच सामन्यावर पकड घेतली. बुमराने गुरबाज आणि हजरतुल्लाह झझईला सलग षटकांत बाद करून अफगाणिस्तानला धक्का दिला. या धक्क्यातून त्यांनी कुणीच सावरू शकला नाही. मग कंबरडे मोडलेल्या अफगाणिस्तानने आपल्या पराभवाची औपचारिकता पूर्ण करण्याचे सोपस्कार पार पाडले. बुमराने 4 षटकांत केवळ 7 धावांत 3 विकेट टिपल्या. अफगाणींचा डाव 134 धावांवर आटोपला. हिंदुस्थानच्या विजयात बुमराचा सिंहाचा वाटा असला तरी सूर्या विजयाचा मानकरी ठरला. अर्शदीपनेही अफगाणिस्तानचे शेपूट गुंडाळताना 3 विकेट टिपल्या.
रोहित-विराटच्या अपयशाची मालिका कायम
सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अपयशाची मालिका अफगाणिस्तानविरुद्धही कायम राहिली. अफगाणी माऱयापुढे रोहितला 13 चेंडूंत केवळ 8 धावा काढता आल्या तर विराट पाऊण तास मैदानात उभं राहूनही 24 चेंडूंत 24 धावा काढू शकला. आजही ही जोडी 11 धावांची सलामी देऊ शकली. त्यामुळे विराटला पुन्हा तिसऱया क्रमांकावर खेळवण्याची वेळ आल्याचे बोलू लागलेय. विराटप्रमाणे शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजाही लवकर बाद झाले.
सूर्याने पुन्हा धावांची आग ओकली
सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या फलंदाजीचा तारणहार ठरला. त्याने हार्दिक पंडय़ाने पाचव्या विकेटसाठी केलेल्या 60 धावांच्या भागीमुळे हिंदुस्थानला 8 बाद 181 अशी मजल मारता आली. सूर्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना 28 चेंडूंत 5 चौकार आणि 3 षटकार खेचत 53 धावा काढल्या. पंडय़ानेही 32 धावांची वेगवान खेळी करताना 3 चौकार आणि 2 षटकार खेचले. अफगाणच्या फझलहक फारुकी आणि राशीद खानने प्रत्येकी 3 विकेट घेत हिंदुस्थानच्या फलंदाजीला नियंत्रणात ठेवले.