
टी–20 वर्ल्ड कप सुरू झाला की, आपल्याकडे क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा कशाची होते? तर हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची. बाकी सामने म्हणजे उपवासाच्या आधीचा फराळ. खरी मेजवानी म्हणजे ही लढत. हल्ली साखळीत ही लढत हमखास होते आणि ती झालीसुद्धा. पण आता कागदावर युद्ध आणि मैदानात फुसका बार ठरत असलेला हा सामना उपांत्य फेरीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता प्रश्न असा की, ही मेजवानी इतक्या वेळा वाढली जातेय की, रस्सा थोडा पातळ झाला आहे असे वाटतेय. पूर्वी हा सामना म्हणजे ताटातली पुरणपोळी असायचा. वर्षातून एकदा, तोही सणासुदीला. आता मात्र आयसीसीने ती पुरणपोळी ‘ऑफर’वर ठेवली आहे एक घ्या, दुसरी फुकट.
हिंदुस्थानचा झंझावात, गोंधळलेला पाकिस्तान
साखळीत हिंदुस्थानने पाकिस्तानला 61 धावांनी हरवलं. सामना असा झाला की पाकिस्तानचे फलंदाज जणू नेट प्रॅक्टिससाठी आलेत की काय, अशी शंका यावी. पण हे चित्र आपण आधीही पाहिलंय. या सामन्यात नवीन असं काही उरलेलं नाही. बांगलादेशचा पुळका आल्याचे दाखवत पाकिस्तानने सुरुवातीला बहिष्काराची भाषा केली. मग आयसीसीने नाक दाबताच त्यांचा बहिष्काराचा फुगा फुटला. शेवटी मैदानावर आले आणि सामना झाला.
सुपर-8 मध्येही दोघांचे ध्येय एकच
सुपर-8 मध्ये हिंदुस्थान एका गटात, पाकिस्तान दुसऱया गटात खेळतोय. त्यामुळे सुपरएट दोघे थेट भिडणार नाहीत. सुपर एटमध्ये एका गटात एक संघ पहिला आणि दुसऱया गटात दुसरा संघ दुसरा आला तर उपांत्य फेरीचे समीकरण जुळले म्हणजे समजा. यात अशक्य असे काही नाही. मात्र दोघेही आपापल्या गटात पहिल्या किंवा दुसऱया स्थानावर राहिले तर उपांत्य लढतीत दोघे आमनेसामने येणार नाही. त्यानंतर विजय सातत्य कायम राखल्यास 2007 सारखी अंतिम लढत पुन्हा रंगू शकते.
2007 ची आठवण आणि आजची वस्तुस्थिती
2007 मध्ये ही लढत पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत रंगली तेव्हा अंगावर शहारे आले होते. अवघं क्रिकेट विश्व थरारलं होतं. आता मात्र प्रत्येक मोठय़ा स्पर्धेत ही भेट घडवून आणण्याचा प्रयत्न असतो आणि तो दिसतो. जणू एखाद्या मालिकेचा ‘स्पेशल एपिसोड’ वारंवार दाखवावा तसं हे घडतंय. एकीकडे आम्ही म्हणतोय, चावून चावून या सामन्याचा चोथा होईल. तरीही चाहत्यांचं मन विचित्र आहे. म्हणतो अरे, पुन्हा का? पण सामना सुरू झाला की सारेच मोबाईल आणि टीव्हीत गुंग होतात. या सामन्याची रंजकता थोडी झिजली असेल, पण धंदा मात्र तेजीत आहे. आयसीसीला माहीत आहे की या लढतीत भावना आहेत, आठवणी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड बाजार आहे.
असो, हा महासंग्राम होणार की नाही, हे गणितावर अवलंबून आहे. पण आयसीसीचा ‘महाउद्योग’ मात्र निश्चित चालूच राहणार. प्रत्येक वेळी आपणही या सामन्याला शिव्या हासडणार, मग सामना त्याच उत्साहाने पाहणार.
आयसीसीचा ‘बिझनेस मॉडेल’
पूर्वी या लढतीला राजकीय, भावनिक, ऐतिहासिक संदर्भ होते. आता त्याला प्रायोजक, टीआरपी आणि जाहिरातींची चौकट घातली गेली आहे. आयसीसीला या सामन्याचं सोनं करायचं आहे आणि प्रत्येक क्षणाला ते करत आहेत. आयसीसीने या सामन्याला आपले बिझनेस मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे या सामन्यांचे तिकिटांचे दर पाहिले की वाटतं आपण क्रिकेट पाहायला जातोय की एखादा रॉक कॉन्सर्ट? स्टेडियम भरतात, टीव्हीसमोर प्रेक्षक खिळतात, जाहिरातींचे दर गगनाला भिडतात. म्हणजे चोहोबाजूंनी क्रिकेटपेक्षा पॅशचा खणखणाट ऐकू येतो.





























































