
टी20 वर्ल्ड कप 2026 ची तयारी आता सुरू झाली आहे. 7 फेब्रुवारीपासून दमदार खेळ करण्यासाठी सराव सामन्यांचा धमाका सुरू झाला आहे. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर आज इंडिया ए आणि अमेरिकेमध्ये सराव सुरू आहे. इंडिया ए ने प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेला 239 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली आहे ती 30 वर्षीय खेळाडू एन जगदीशन याने. हा तोच एन जगदीशन आहे ज्याला आयपीएलच्या लीलाव प्रक्रियेमध्ये कोणत्याच संघाने खरेदी केले नाही. मात्र, त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच धक्का दिला आहे.
तामिळनाडूच्या यष्टीरक्षकाने अमेरिकेविरुद्ध विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली आहे. त्याने अमेरिकेन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि 55 चेंडूंमध्ये 104 धावांची आक्रमक खेळी केली. त्याने 55 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली. त्याने फक्त 49 चेंडूंमध्ये आपलं खणखणीत शतक झळकावलं. तिलक वर्मा आणि जगदीशन दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या आणि अमेरिकेला जिंकण्यासाठी 239 धावांचे आव्हान दिले आहे.





























































