
टी-20 विश्वचषक क्रिकेट सामन्यांचा आनंद आता माय मराठीत घेता येणार आहे. ‘जिओ हॉटस्टार’वर मराठी भाषेत समालोचनाचा पर्याय क्रिकेटप्रेमींना उपलब्ध झाला आहे.
क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठी भाषेत व्हावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा केला होता. अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी मुंबईतील हॉटस्टारच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. क्रिकेट सामन्यांचे समालोचन हिंदी, तामीळ, तेलगू, बंगाली भाषेत असताना मराठी भाषेला वगळणे हा मराठी क्रिकेटप्रेमींवर अन्याय आहे. मराठी भाषेत समालोचन व्हायलाच हवे, अशी मागणी मनसेने केली होती. ती मान्य झाली.
राज ठाकरे यांचे आवाहन
‘आपण मराठीतच सामने पाहिले तर आपण आपल्या भाषेसाठी आग्रही असतो हे त्यांना कळेल. त्यामुळे जिओ हॉटस्टारवर मराठीचा पर्याय निवडूनच सामने पहा,’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी क्रिकेटप्रेमींना केले आहे.




























































