दुखापतग्रस्त बुमराहची जागा सिराज घेणार

उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजला टीम इंडियात संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सिराज दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची जागा घेणार आहे.

एक दिवस अशीच टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषकासाठीच्या हिंदुस्थानी संघातून वगळण्यात आले होते. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. या गंभीर दुखापतीमुळे बुमराह 4 ते 6 महिने क्रिकेट लढतींना मुकण्याची शक्यता आहे.

बुमराहला सावरण्यासाठी 4 ते 6 महिने लागणार

जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखण्यातून सावरण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात तो टीम इंडियाचा भाग नव्हता. बंगळुरूमध्ये सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर बीसीसीआय वैद्यकीय पथकाच्या सांगण्यावरून त्याला पहिल्या टी-20 सामन्यातून वगळण्यात आले.

सिराजचे 7 महिन्यांनी संघात पुनरागमन

बीसीसीआयने शुक्रवारी सिराजची टीम इंडियात निवड झाल्याची माहिती दिली. 28 वर्षीय मोहम्मद सिराजने 7 महिने 2 दिवसांनंतर वापसी केली आहे. 27 फेब्रुवारी 2022 रोजी सिराज शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. धर्मशाला येथे हा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळवण्यात आला होता.