
शिमरोन हेटमायरच्या तुफानी फलंदाजीने आणि रोमारिओ शेफर्डच्या विध्वंसक गोलंदाजीने वेस्ट इंडिजने टी-20 विश्वचषकाच्या ‘ग्रुप सी’ मधील सामन्यात स्कॉटलंडचा 35 धावांनी पराभव करत विजयी सलामी ठोकली.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 5 बाद 182 धावांचा डोंगर उभारला. शिमरोन हेटमायरने अवघ्या 22 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत स्कॉटलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 36 चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांसह 64 धावांची वादळी खेळी साकारत सामना पूर्णतः वेस्ट इंडिजच्या बाजूने झुकवला.
183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडची फलंदाजी रोमारिओ शेफर्ड आणि जेसन होल्डरच्या माऱयापुढे कोलमडली. शेफर्डने 5 धावांत 20 बळी घेत स्कॉटिश फलंदाजांची पंबर मोडली. त्याने मॅथ्यू क्रॉस, मायकेल लीस्क आणि ऑलिव्हर डेव्हिडसन यांना सलग बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. जेसन होल्डरनेही 3 बळी घेतले.रिची बेरिंग्टन (42) आणि टॉम ब्रुस (35) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा ठरला. अखेर स्कॉटलंडचा संघ 18.5 षटकांत 147 धावांवर गारद झाला.























































