‘ताडदेवचा राजा’ मंडळाचा पर्यावरण जागर, गणेशोत्सवात 1 लाख झाडे लावणार

गणेशोत्सवासोबतच मुंबईतील सर्वच मंडळे सामाजिक बांधिलकी जपत असतात. या माध्यमातून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळानेही पर्यावरणाला हातभार लावणारा उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे.

मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. मोठे गणपती गणेशमूर्ती कारखान्यातून वाजतगाजत मिरवणुकीने मंडपाकडे निघाले आहेत. बाप्पांच्या आगमनासाठी मंडपही सजू लागले आहेत. त्यासोबतच यंदाच्या गणेशोत्सवात सामाजिक उपक्रमांची परंपरा जपण्यासाठी मंडळांकडून आखणी सुरू झाली आहे. त्याचाच भाग म्हणून ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवात 1 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली.

ताडदेवचा राजाचे ढोलताशांच्या गजरात गणेशभक्तांच्या गर्दीत मिरवणुकीने मंडपात आगमन झाले. मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांनी यंदाची मूर्ती साकारली आहे.