
ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या कोलारा परिसरात गेल्या चार महिन्यात पाच जणांचे बळी घेणाऱ्या वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले. हे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.
ताडोबा प्रकल्पाच्या कोलारा प्रवेशद्वारालगत असलेल्या जंगलात गावकरी सरपण आणि तेंदू पाने गोळा करण्यासाठी जात असतात. घनदाट जंगलाचा हा परिसर आहे. मात्र जगण्यासाठी तजवीज करण्याकरिता परिसरातील नागरिक नेहमीच जंगलात जातात. यातूनच वाघाचे हल्ले झाले आहेत. फेब्रुवारी ते आतापर्यंत कोलारा, वामनगाव, सातारा तुकूम या भागात वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचे बळी गेले. यामुळं लोकांत मोठा असंतोष निर्माण झाला. आणि यातूनच वाघाला पकडण्याची किंवा मारण्याची मागणी जोर धरू लागली. लोकांचा असंतोष लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी या वाघाला बेशुद्ध करून बंदिस्त करण्याचे आदेश ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाला दिले. KT-1 नावाचा हा वाघ असून कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून त्याची ओळख पाठवण्यात आली. या वाघाची वागणूक अस्वाभाविक असल्याचंही दिसून आलं. त्यामुळं त्याला पकडण्यासाठी 30 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली. वाघाला केवळ बंदिस्त करण्याचे हे आदेश आहेत.































































