तथागत बुद्धांच्या पुतळ्यावर बसून काढला फोटो, नेटकऱ्यांनी आयुषमानच्या पत्नीला फटकारले

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना याची पत्नी ताहिरा कश्यप ही सध्या नेटकऱ्यांच्या टिकेला सामोरे जात आहे. ताहिराने तथागत गौतम बुद्धांच्या पुतळ्यावर बसलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले आहे. नेटकऱ्यांकडून टीका सुरू होताच ताहिराने पुन्हा एक पोस्ट शेअर करत सर्वांची माफी मागितली असून तो फोटो देखील डिलीट केला आहे.

ताहिरा कश्यप ही एक लेखिका आहे. काही दिवसांपूर्वी ती परदेशात फिरायला गेलेली असताना तिथे तिने तथागत गौतम बुद्धांच्या मोठ्या पुतळ्यावर बसून फोटो काढला होता. हा फोटो तिने इंस्टाग्रामवर टाकल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर बुद्ध धर्माचा अपमान केल्याची टीका केली. तसेच अशा प्रकारचा फोटो काढणे हे मुर्खपणाचे असून तिने एका समूदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे.

टीकेची झोड उठल्यानंतर ताहिराने तो फोटो डिलीट केला आहे. त्यानंतर तिने माफी मागणारी एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ‘माझ्या पोस्टमुळे जर कुणाचा अपमान झाला असेल तर मी त्यासाठी माफी मागते. मी स्वत: बौद्ध धर्माची उपासक आहे. कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता’, असे ताहिराने शेअर केले आहे.