आडगाव येथील तलाठी हत्त्या प्रकरण, तलाठी मंडलाधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

हिंगोली जिल्ह्यातील आडगाव येथील तलाठी हत्त्या प्रकरणाचा आज येथील तलाठी व मंडळ आधिकऱ्यानी काम बंद ठेवत व ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रताप ढाकणे यांनी पाठिंबा दिला. फेरफार प्रलंबित असल्याच्या कारणावरून संतोष पवार या तलाठ्याची हत्या करण्यात आली होती.

गुरुवारी येथील तलाठी संघटनेचे सदस्य मनोज खेडकर,रवींद्र शेकटकर,वैभव कराड,मनोज खेडकर,राजू मेरड,रवी गर्जे,प्रदीप मगर,अनिल धोत्रे,गणेश वावरे,गजानन शिकारे,शंकर भडके,अशोक थोरात,संतोष आडागळे,सोनल गोलवड,अक्षय भोकरे,अमोल कचरे,अमित टिळेकर, हर्षु गवई,दीपक मिरपगार,दादासाहेब वावरे यांनी तहसील कार्यालयाच्या दारात धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला नायब तहसिदार संघटनेने पाठींबा दिला.

या वेळी बोलताना संघटनेचे सचिव मनोज खेडकर म्हणाले की, राज्यात कायद्याची भीती व पोलिसांचा धाक गुन्हेगारांना वाटत नसून लोकशाहीची व्यवस्था चालवणारे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी हेच सुरक्षित नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा मिळू शकेल. सरकारने संवेदनशील होऊन या कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा तसेच गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच जरब बसवण्यासाठी पावले उचलावी.  तर यावेळी ढाकणे म्हणाले की, हा प्रकार निंदनीय आहे. शासनात काम करणाऱ्या व्यक्तीवरच असा हल्ला होणे दुर्दैवी आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही हे सिद्ध झाले असून मृत तलाठ्यांच्या वारसांना शासनाने तातडीने योग्य ती मदत द्यावी. नायब तहसिलदार दिग्विजय पाटील व भानुदास गुंजाळ यांना या वेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.