तीन हजाराची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी पकडला

bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

अनुदान व शेती वाटप पत्रासाठी तीन हजारांची लाच मागितल्याप्रकरणी मोराळा सज्जाचे तलाठी बाळासाहेब बणगे यांना बीडच्या लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाली.

तालुक्यातील मोराळा येथील शेतकऱ्यांना तलाठी बाळासाहेब महादेव बणगे यांनी कुटुंबातील व्यक्तींचे शेतीवाटप पत्र करून देतो तसेच अनुदान मिळवून देतो असे सांगून यासाठी 4500 रुपयांची मागणी केली हेती. तडजोडीअंती तीन हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर बीड लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

बीड विभागाचे बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी, पो.ना.श्रीराम गिराम, पो.शि.संतोष मोरे, पो.शि. भारत गारदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तलाठी बणगेंविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू आहे. आष्टी शहरातील अनेक कार्यालयांमध्ये पैशाशिवाय कामे होत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. आष्टीच्या महसूल विभागातील लाचलुचपत प्रकरणाची वीस दिवसांतील ही दुसरी कारवाई आहे.

आपली प्रतिक्रिया द्या