नववर्षाच्या सुरुवातीलाच तामीळनाडू सरकारचा अदानींना धक्का, स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द

हिंदुस्थानातील एकापाठोपाठ जमिनी, मोक्याचे भूखंड मोदी सरकारच्या मदतीने घशात घालणाऱया उद्योजक गौतम अदानी यांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार धक्का बसला आहे. तामीळनाडूच्या द्रमुक सरकारने राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे ग्लोबल टेंडर रद्द केले आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सने या प्रकल्पासाठी जारी केलेल्या निविदेत सर्वात कमी किमतीची बोली लावल्याचा दावा केला होता. मात्र तामीळनाडू जनरेशन अॅण्ड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशननने खूप जास्त किंमत सांगितल्याचे कारण देत ही निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अदानींवरील आरोपांमुळे कंत्राट रद्द केले?

सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱयांना सुमारे 150 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 2100 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अदानी यांच्यावर आहे. त्यामुळे गौतम अदानींना कंत्राट देण्यास तामीळनाडू सरकारचा विरोध असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकरणात अमेरिकेच्या वकिलांनी अदानी आणि समूहाच्या इतर काही अधिकाऱ्यांवर हा आरोप केला आहे, मात्र कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.