निवडणुकीच्या तोंडावर आयकराच्या धाडी; विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न, स्टॅलिन यांचा भाजपवर जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाच्या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले आहे. तामीळनाडूतील काँग्रेस नेते के. सेल्वापेरुंथगई यांच्या निवासस्थानी झालेल्या आयकर छाप्याचा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तीव्र निषेध केला.

स्टॅलिन यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये या कारवाईला “कटकारस्थान” असे म्हटले आहे. निवडणूक प्रचार संपण्यास अवघे 48 तास शिल्लक असताना अशा प्रकारची कारवाई करण्यात येणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर आघात करणारे असल्याचे त्यांनी म्हटले. “हिंदुस्थान हे लोकशाही राष्ट्र आहे, हे विसरून भाजप सरकार पराभवाच्या भीतीने विरोधकांना गप्प बसवण्यासाठी अत्याचारासारख्या कारवाया करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

स्टॅलिन म्हणाले की, भाजप सत्तेच्या भीतीतून अशा पद्धतीने यंत्रणांचा वापर करत आहे. “तामीळनाडूतील जनता या सर्व घडामोडींना योग्य वेळी ठोस उत्तर देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी ही कारवाई केवळ कायदेशीर चौकशी नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सूचित केले.