तामिळनाडू त्रिभाषा धोरण स्वीकारणार नाही – उदयनिधी स्टॅलिन

तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाला आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (एनईपी) तीव्र विरोध दर्शवला आहे. तामिळनाडू कधीही त्रिभाषा धोरण स्वीकारणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्या राज्यांनी हिंदी स्वीकारली, तिथे त्यांची मातृभाषा नष्ट होण्याचा धोका आहे. तामिळनाडू केवळ द्विभाषिक धोरणालाच पाठिंबा देईल, ज्यात तमिळ आणि इंग्रजी यांचा समावेश आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर शिक्षण आणि भाषा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “आम्ही आमच्या हक्काची आणि करातून मिळालेल्या निधीची मागणी करत आहोत. केंद्र सरकारने तामिळनाडूला समग्र शिक्षण अभियानासाठी सुमारे २,४०० कोटी रुपये देण्यास नकार दिला आहे, कारण आम्ही त्रिभाषा सूत्र स्वीकारले नाही. तामिळनाडूच्या जनतेने याची नोंद घेतली आहे आणि योग्य वेळी ते याला उत्तर देतील.”

त्यांनी पुढे सांगितले की, “तामिळनाडू हा पेरियार यांच्या विचारांचे राज्य आहे आणि येथील जनता आपल्या भाषा आणि शिक्षणाच्या हक्कांसाठी लढेल.”