
तामीळनाडू राज्यातील कांचीपुरम येथील एका गावात रविवारी शिवमंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना गावकऱयांना जुनं सोने सापडलं. साधारण अर्धा किलो सोनं आहे. सोनं अधिकाऱ्यांनी जप्त केलं असून सरकारच्या खजिन्यात जमा केलं आहे.
उतीरामेरूर गावातील नागरिकांनी शिवमंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःच हाती घेतले आहे. हे काम सुरू असताना गाभाऱ्यात जाणाऱ्या शिडीच्या खाली सोनं सापडले. सोनं सापडल्याचे वृत्त गावात पसरल्यानंतर सरकारी अधिकारी मंदिरात आले. त्यांनी सोनं सरकारच्या ताब्यात देण्यास गावकऱ्यांना सांगितले. मात्र भक्त आणि स्थानिक नागरिक तयार होईना.
मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर सोनं त्याच जागी परत ठेवता येईल, असे गावकऱयांचे म्हणणे होते. मात्र अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते. गावकऱ्यांचा वाढता विरोध बघून गावात पोलीस फौज वाढवण्यात आली. एका बॉक्समध्ये सोनं ठेवून, सीलबंद बॉक्स घेऊन अधिकारी गेले.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेलं सोनं खूप प्राचीन काळातील आहे. असं मानलं जातंय की सोनं चोल काळातील असावे.
मंदिराच्या शिडीखाली सोनं सापडणं शुभ मानले जाते. ही परंपरा खूप प्राचीन आहे, असे गावकरी सांगत आहेत. सोनं मंदिरात सापडलं आहे. त्यामुळे ती मंदिराची मालमत्ता आहे. सरकारला ते जप्त करता येणार, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.

























































