राज्यात 26 ठिकाणी गोवरचा संसर्ग, लसीकरण न झाल्याचा परिणाम; आरोग्यमंत्र्यांची कबुली

मुंबईसह राज्यातील 26 ठिकाणी गोवरचा संसर्ग आढळून आला आहे. लसीकरण न झाल्यामुळे बालकांना गोवर होत असल्याचे प्राथमिक स्तरावरील सर्वेक्षणातून समोर आले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज दिली.

गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबई शहरातील ठरावीक प्रभागात गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागात उद्यापासून विशेष मोहीम राबवली जाणार असून लसीकरणासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बालकांनी लसीकरण करून घ्यावे यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. या सर्व ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि महानगरपालिकेच्या यंत्रणांकडून सर्वेक्षण आणि तपासणी करण्यात येत आहे. या भागात लसीकरण वाढविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. संशयित लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी करण्यात येत असून आवश्यकता भासल्यास त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील रुग्णसंख्या 323 वर

मुंबईत गोवर संशयित आणि निदान झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज एकाच दिवसांत 15 रुग्ण आढळल्याने गोवरबाधितांची संख्या 323वर पोहोचली आहे. तर 92 संशयित आढळले असून एकूण संशयितांची संख्या 4272 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत 22 रुग्ण ऑक्सिजनवर असून 2 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.

मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व गोळ्यांचे वाटप, जनजागृती केली जात आहे. मुंबईत 58 लाख 36 हजार 691 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात 330 बेडस् उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 117 बेडवर रुग्ण असून 213 बेड रिक्त आहेत. 14 हजार 105 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या 1 लाख 55 हजार 131 मुलांना लस देण्यात आली आहे. मुंबईत 9 ठिकाणी गोवरच्या पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 10 टक्के पेक्षा अधिक आहे.